कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टीने संपूर्ण राज्यात झुंडशाहीचे राजकारण सुरू केले आहे. ही झुंडशाही मोडीत काढून श्रीमती जयश्री जाधव यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहन खा. संजय मंडलिक यांनी केले. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक प्रचाराच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते.
यावेळी खा. मंडलिक म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारमुळे शहरात अनेक विकासाची कामे झाली आहेत. ही कामे प्रत्येक घरात पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. श्रीमती जयश्री जाधव यांना निवडून आणणे हीच कै. आ. चंद्रकांत जाधव यांना श्रद्धांजली असेल.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे. या संधीचे सोने शिवसैनिकच करतील. कोल्हापूर शहरातील शिवसेनेची वज्रमूठ व ताकद भारतीय जनता पक्षाचा पराभव करतील आणि श्रीमती जाधव यांना विजयी करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, सुरेश साळोखे, रविकिरण इंगवले आदी उपस्थित होते.