नवी दिल्ली, मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याकरिता अवघे तीन दिवस उरले आहेत. तथापि, महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांसमोर 40 ते 45 जागांचा पेच काही सुटताना दिसत नाही. सर्वच पक्षांची उमेदवार निवडीसाठी लगीनघाई सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी महायुतीतील भाजप आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गट व शरद पवार गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने जतमधून गोपीचंद पडळकर यांना तर शिराळा मतदारसंघातून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.
मविआ आणि महायुतीमध्ये अजूनही जवळपास 40 ते 45 जागांवरून वाद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या जागांवर तोडगा काढण्यासाठी दोन्हीकडील ज्येष्ठ नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये काही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यापूर्वी भाजपने सर्वप्रथम 99 जागांची पहिली यादी जाहीर केली होती. अशा प्रकारे भाजपकडून आतापर्यंत 121 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अन्य जागांची घोषणा करण्यासाठी भाजप नेत्यांकडून बैठकांचा सपाटा सुरू आहे.
काँग्रेसने आपली 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी काँग्रेसने 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामुळे काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या 71 झाली आहे. अन्य उमेदवारांची घोषणा लवकरच होईल, असे काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
मुंबईसह राज्यातील काही मतदारसंघांबाबत काँग्रेसशी वाटाघाटी सुरू असतानाच ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी आणि पाठोपाठ तिसरी यादी जाहीर केली आहे. यात एकूण 18जणांचा समावेश आहे. ठाकरे गटाने 65 उमेदवारांची पहिली यादी घोषित केली होती. त्यामुळे आता ठाकरे गटातील उमदेवारांची संख्या 83 वर पोहोचली आहे.
शरद पवार गटानेही आपली 22 उमेदवारांचा समावेश असलेली दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. दोन दिवसांपूर्वी पवार गटाने आपली 45 जणांची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली होती. त्यामुळे पवार गटाने घोषित केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या 67 झाली आहे.