कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या जीवनावरील संशोधनात्मक पुस्तकाचे रविवारी (दि. 7) दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. शिवाजी पार्क येथील मुख्याध्यापक संघाच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात सकाळी साडेदहा वाजता हा सोहळा होणार आहे.
जागर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. बी. जी. मांगले लिखित या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राजसिंहराजे खर्डेकर आहेत. या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक संजयसिंह चव्हाण आणि साहित्यिक बी. एस. हिर्डेकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थीप्रिय शिक्षक, अभ्यासू व प्रभावी वक्तृत्व शैलीने संसद गाजवणारे खासदार, 252 प्राथमिक शाळा यशस्वी चालवणारे, शिक्षण प्रचार, प्रसार हे ध्येय मानून अविरत कार्य करणार्या बॅरिस्टर खर्डेकर यांचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान या पुस्तकरूपाने लोकांसमोर येणार आहे.
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक बॅ. बाळासाहेब खर्डेकर-निंबाळकर फाऊंडेशन व जागर फाऊंडेशन यांच्या वतीने निमंत्रक विक्रमसिंह खर्डेकर यांनी केले आहे.