कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेची काळजी न घेतल्यामुळे होणार्या जीवघेण्या संसर्गाला बळी पडणार्या महिलांची संख्या वाढत आहे. आजही केवळ 12 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिनचा वापर करत आहेत. तो वाढविण्यासाठी दारिद्य्र रेषेखालील (बीपीएल) महिलांना फक्त एक रुपयात 10 नॅपकिनचे पॅकेट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा फायदा 60 लाख महिलांना होणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. 15 ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार आहे.
गेल्या वर्षी मासिक पाळीच्या काळात योग्य पद्धतीचा वापर न केल्याने जगातील 8 लाख महिलांचा मृत्यू झाला. स्त्रियांच्या होणार्या मृत्यूमागे मासिक पाळी हे पाचवे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले जाते. आदिवासी आणि ग्रामीण भागातील महिलांना मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे जीवघेण्या संसर्गाला सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी भारतात 60 हजार गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणार्या मृत्यूंपैकी दोन तृतीयांश मृत्यू मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेबाबत योग्य काळजी न घेतल्याने होतात, याकडेही मुश्रीफ यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्रात 66 टक्के स्त्रिया मासिक पाळीच्या काळात योग्य काळजी घेतात. यात शहरी भागातील महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे सांगून मुश्रीफ म्हणाले, ग्रामीण भागातील केवळ 17.30 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात. सॅनिटरी पॅड वापरण्याबाबत जागरुकता निर्माण करण्याबरोबरच कमी किमतीत त्यांना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे लक्षात आले. त्यामुळे शासनाच्या वतीने 19 वर्षावरील दारिद्य्ररेषेखालील महिलांना नाममात्र एक रुपयात दरमहा दहा सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
गावात ही नॅपकिन्स उपलब्ध होतील. त्यांची माहिती आशा, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून संकलित करण्यात येणार आहे. वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक गावात इन्सिनरेटर मशिन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी 200 कोटीची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
– गावस्तरावरच गावातील ग्रामसंघामार्फत महिलांना उपलब्ध होणार सॅनिटरी नॅपकिन्स
– सॅनिटरी नॅपकिन किटचा वापर आणि वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जागरूकता, प्रचार करणार
– सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक गाव स्तरावर मशिन बसविण्यात येणार
– दारिद्य्र रेषेखालील महिलांची माहिती आशा, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्?याकडून संकलित करण्?यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांना सॅनिटरी नॅपकिन वितरित करण्यात येणार आहे.