कोल्हापूर

बांधकाम साहित्य महागले; गृह प्रकल्पांना फटका

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर : राजेंद्र जोशी

बांधकाम साहित्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बांधकाम व्यवसायांत अस्वस्थता आहे. यापूर्वी ग्राहकांबरोबर केलेल्या करारानुसार सदनिका वा व्यावसायिक अस्थापनांच्या किमतीत वाढ करता येत नसल्याने 'क्रिडाई' ही बांधकाम व्यावसायिकांचे नेतृत्व करणारी संघटना सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम स्थगित ठेवण्याच्या मानसिकतेत आहे. शिवाय, नव्या ग्राहकांबरोबर करार करताना साहित्याच्या वाढीच्या प्रमाणात दरवाढीविषयी ग्राहकांची संमती घेणारे कलम अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्टीलचा दर 45 हजार रुपये प्रतिटनावरून 85 हजार प्रतिटनावर पोहोचला आहे. 260 रुपयाला मिळणारे सिमेंटचे पोते 400 रुपयांवर, विटांच्या दरामध्ये हजारी दीड हजार रुपये, तर वाळू 100 घनफुटाला 6 हजार रुपयांवरून साडेसात हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. 'रेरा' (रिअल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट) कायद्यानुसार विक्री करार केल्यानंतर व्यावसायिकाला करारातील किमतीव्यतिरिक्त अतिरिक्त किंमत घेता येत नाही. शिवाय, करार कालावधीत ग्राहकाला त्याची वास्तू हस्तांतरित करण्याचे बंधन आहे.

यामुळे बांधकाम व्यावसायिक कात्रीत सापडला आहे. साहित्याच्या दरवाढीचा परतावा ग्राहकांकडून घेता येत नाही आणि दरवाढीमुळे बांधकामे परवडत नाहीत. या पार्श्वभूमीवर किंमतवाढ खाली येईपर्यंत महिनाभर कामे स्थगित ठेवावीत, या विचारावर व्यावसायिक आले आहेत. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र 'क्रिडाई' ची बैठक झाली. यात हा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे माजी अध्यक्ष राजीव परीख यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना दिली. कोरोना ओसरल्यानंतर बांधकाम प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू झाले. गृह कर्जाचे व्याज दर कमालीचे घसरल्याने ग्राहकवर्गही मोठ्या प्रमाणात खरेदीकडे आकृष्ट झाला होता. परंतु, बांधकाम साहित्याच्या दराने उसळी घेतल्याने या व्यवसायावर चिंतेचे सावट आहे.

बांधकाम साहित्य किंमतवाढीला केवळ रशिया-युक्रेन युद्धस्थिती जबाबदार नाही. तो एक घटक आहे. यउलट संबंधित वस्तूंच्या किमतीवर शासनाचे कोणतेच नियंत्रण नाही. ते आणावे, अशी संघटनेची मागणी आहे.
– राजीव परीख, माजी अध्यक्ष, 'क्रिडाई'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT