कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने शुक्रवारपासून सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. त्यासंदर्भात संबंधितावर दंडासह कठोर कारवाईचेही आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या चार पथकांनी कोल्हापूर शहरात फिरती करून कारवाईचा प्रयत्न केला. परंतु सिंगल यूज प्लास्टिक बघायलासुद्धा मिळाले नाही! दरम्यान, कारवाईविषयी विचारणा होऊ लागल्यावर महापालिकेने रात्री भाऊसिंगजी रोडवरील एका व्यापार्यावर कारवाई करून पाच हजार रुपये दंड वसूल केला.
प्लास्टिकच्या कांड्यासह फुग्यासाठी प्लास्टिकच्या कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी कांड्या, आईस्क्रीम कांड्या, सजावटीचे प्लास्टिक व थर्माकोल, प्लेटस्, कप, ग्लासेस, कटलरी, स्ट्रॉ, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेट पाकिटाभोवती प्लास्टिक फिल्म गुंडाळणे, प्लास्टिकच्या पीव्हीसी बॅनर (100 मायक्रॉनपेक्षा कमी), सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग), कंपोस्टेबल प्लास्टिक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून), सर्व प्रकारच्या ओव्हन बॅग्ज, सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन यात डिश, बाऊल, कंटेनर (डबे) आदींवर बंदी आहे.
महापालिका प्रशासनाने वरील बंदी असलेल्या सर्वांविषयी कारवाई करण्यासाठी चार पथके तैनात केली आहेत. एका पथकात तीन आरोग्य निरीक्षक, तीन मुकादम व चार कर्मचार्यांचा समावेश आहे. चारही पथके दिवसभर ठिकठिकाणी फिरली. परंतु रात्रीपर्यंत एकाही ठिकाणी वरील बंदी असलेल्या वस्तू आढळल्या नाहीत.
प्लास्टिकबंदीसाठी गावपातळीवर समिती
शासनाने प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची ग्रामीण भागात कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ग्रामपंचायत विभागाला दिल्या आहेत. यासाठी गाव पातळीवर समिती स्थापन करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पहिल्या दिवशी ग्रामीण भागात प्लास्टिक बंदीबाबत एकही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले. केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने एकदा वापरल्या जाणार्या प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या निर्णयानुसार एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण विक्री, आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
यामध्ये पॉलिस्टिरीन आणि विस्तारित पॉलिस्टिरीनसह फुग्यांसाठी प्लास्टिकच्या कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, सजावटीसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक व थर्माकोल, प्लेटस्, कप, ग्लास, काटे, चमचे चाकू, पिण्यासाठी स्ट्रॉ, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेट पाकिटावरचे प्लास्टिक, शंभर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर याबरोबरच सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग), कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून कंपोस्टेबल प्लास्टिक, सर्व प्रकारच्या नॉनओव्हन बॅग्स, हॉटेलमध्ये पार्सलसाठी वापरण्यात येणार्या डिश, बाऊल, कन्टेनर (डबे) आदींचा समावेश आहे. हे प्लास्टिक सापडल्यास 5 हजारपासून 25 हजार रुपयापर्यंत दंड व तीन महिन्यांचा कारावास अशी शिक्षा आहे.
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ठराव केले आहेत. तसेच प्रत्येक गावामध्ये प्लास्टिक बंदीच्या कारवाईसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी गावामध्ये फलक लावण्यात आले आहेत. ग्रामीण भागात कारवाईची यंत्रणा सक्षम नसल्यामुळे प्लास्टिक बंदीच्या कारवाईकडे लक्ष लागून राहिले आहे.