कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : आंबेवाडी (ता. करवीर) येथील व्हिनस परमिट रूम आणि बीअर बार, लॉजिंग तसेच पुईखडी परिसरातील ऑन द रॉक्स हॉटेल आणि लॉजिंगवर स्थानिक गुन्हे अन्वेषणने छापा टाकून वेश्याअड्ड्या चा पर्दाफाश केला. याप्रकरणी 6 जणांना अटक, तर दोन पीडितांची सुटका करण्यात आली.
या कारवाईत रोख रक्कम, दोन रिक्षांसह सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयाने संशयितांना 5 दिवसांची पोलिस कोठडी दिली. सुरेश पांडुरंग लाड (वय 50, रा. महाद्वार रोड, जिरगे गल्ली), अतुल शंकर बेलेकर (25, करडवाडी, ता. भुदरगड), एजंट नईम शकील उस्ताद (29, हळदकर गल्ली, जुना बुधवार पेठ), हणमंत दिलीप खरजे (31, साळोखे पार्क), सोपान महादेव इंगळे (26, रा. राजेंद्रनगर), संजय सुरेश बेलेकर (39, रा. तांबाळे, ता. भुदरगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चौकशीत आणखी काही एजंटांची नावे निष्पन्न झाली आहेत. संबंधितांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले.
शहर परिसरासह उपनगर व ग्रामीण भागात वेश्याअड्डे चालविणार्या हॉटेल्स, लॉजिंगचे व्यवसाय परवाने रद्द करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांकडे प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
व्हिनस परमिट रूम आणि बीअर बार, लॉजिंग तसेच पुईखडी येथील ऑन द रॉक्स हॉटेल आणि लॉजिंगमध्ये खुलेआम वेश्याअड्ड्या चालविले जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी एलसीबी व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला कारवाईचे आदेश दिले होते.
पोलिस निरीक्षक जाधव, सहायक निरीक्षक श्रद्धा आंबले यांच्यासह पथकाने बुधवारी रात्री छापा टाकून कारवाई केली. त्यात 6 जणांना जेरबंद करण्यात आले आहे. करवीर पोलिस ठाण्यात संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.