कोल्हापूर

पाश्चिमात्यांनी कोंडी केलेल्या रशियाच्या मदतीला भारत

दिनेश चोरगे

कोल्हापूर; राजेंद्र जोशी : युरोपियन युनियनने जाहीर केलेली बंदीची घोषणा आणि सात देशांनी रशियन क्रूड ऑईलच्या किमतीवर निर्बंध आणण्याचा घेतलेला निर्णय या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून क्रूड ऑईलच्या आयातीचा उच्चांक गाठला आहे. नोव्हेंबरमध्ये रशियातून भारतामध्ये दररोज सरासरी 11 लाख 70 हजार बॅरल्स क्रूड ऑईलची आयात नोंदविण्यात आली असून क्रूड ऑईलची आतापर्यंतची ही सर्वात मोठी आयात समजली जाते आहे.

युद्धामुळे क्रूड ऑईलच्या निर्मितीमध्ये बलाढ्य समजला जाणारा रशिया सध्या एकाकी पडला आहे. युरोपियन युनियनने 5 डिसेंबरपासून रशियन क्रूड ऑईलच्या आयातीवर बंदी आणली आहे आणि जी-7 या सात राष्ट्रांच्या समूहाने रशियन क्रूड ऑईलच्या किमतीवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भारताचे आजवर मित्रराष्ट्र म्हणून संबंध ठेवून असलेल्या रशियाला मदतीचा हात दिला आहे. युरोपियन राष्ट्रांनी रशियाकडून आयात निच्चांकी पातळीवर आणल्यानंतर नोव्हेंबरमध्येच भारताने रशियन क्रूड ऑईल खरेदीला जोर दिला.

दैनंदिन सरासरी 2 लाख 72 हजार बॅरल्स प्रतिदिन होणारी आयात प्रतिदिन 11 लाख 70 हजार बॅरल्सवर गेली, असे एस अँड पी ग्लोबल कमोडिटी या संस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

युरोपियन युनियनकडून आयात घटवली

रशियातून प्रतिदिन सुमारे 30 लाख बॅरल्स क्रूड ऑईलचे उत्पादन केले जाते. युरोपियन युनियन आणि अन्य राष्ट्रांना या तेलाचा पुरवठा होतो. तथापि, युरोपियन युनियनने आयात 3 लाख 8 हजार बॅरलवर खाली घसरल्याने रशियाची कोंडी होत होती. या स्थितीत भारताने रशियाला हात दिला ही आयात 11 लाख 70 हजार बॅरल्सवर नेण्यात आली. भारताबरोबर चीननेही रशियाकडून क्रूड ऑईलच्या आयातीत सुधारणा करीत आयात प्रतिदिन 9 लाख 18 हजार बॅरल्सवर नेली आहे. आशिया खंडातील भारत आणि चीन या दोन देशांकडून रशियन क्रूड ऑईलच्या उत्पादनापैकी सुमारे 68 टक्के क्रूड ऑईल आयात होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT