कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : मुस्लिम धर्मियांचे रमजानचे पवित्र पर्व आजपासून (रविवार) सुरू होत आहे. शनिवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर चाँद कमिटीने त्याची अधिकृत घोषणा केली. 3 एप्रिल ते 2 मे पर्यंत रोजे सुरू होत आहेत. सहरी व इफ्तारच्या तयारीसाठी फळे, सुका मेवा, खजूर यांच्यासह बेकरी पदार्थ, मिठाई खरेदी मुस्लिम बांधवांनी केली.
राधानगरी मौलाना हाफीज सिद्दीकसाब, पन्हाळा नवाजभाई यांच्यासह 10 ते 12 समाज बाधवांना चंद्रदर्शन झाले. तसेच कानपूर, आझमगड, पटणा, जालना, शिल्लोड, वासीम, लखनऊ, विजयवाडा, बेंगलोर, दिल्ली, देवबंद, रत्नागिरी, रायगडसह अन्य शहरांत चंद्रदर्शन झाले. चंद्रदर्शनची साक्ष मिळाल्याने तराबीहची नमाज पठण शनिवारी झाले. यानंतर सायंकाळी 7 वाजता चाँद कमिटीची दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग येथे मगरीब नमाजनंतर इरफान कासमी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत रविवारपासून रमजान रोजे सुरू होत असल्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी मुफ्ती इरशाद, नाझिम पठाण, अब्दुलसलाम कासमी, अ. रऊफ नाईकवडे, अब्दुल राजिक कासमी, मुबीन बागवान यांच्यासह मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते. रमजानच्या महिन्यात मुस्लिम धर्मियांत विशेष महत्त्व असते. यातही महिनाभराचे रोजे अधिक महत्त्वाचे मानले जातात.
यानिमित्ताने रोजच्या इफ्तार पार्टी, अन्नदान, फितरा, जकातचे वाटप, रोज रात्री तराबीहीची सामुदायिक नमाज अशी दिवस-रात्र उपासना असते.