कोल्हापूर

पन्हाळगड हाऊसफुल्‍ल

Arun Patil

पन्हाळा ; पुढारी वृत्तसेवा : किल्‍ले पन्हाळगडावर पावसाळी पर्यटनामुळे पन्हाळगड हाऊसफुल्‍ल झाला असून, गर्दीमुळे दिवसभर वाहतुकीची कोंडी झाली होती. पन्हाळ्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असून, पन्हाळगडावर धुक्याची दुलई पसरली आहे.पाऊस आणि दाट धुके यामध्ये चिंब भिजण्यासाठी पर्यटकांनी रविवारी गडावर गर्दी केली होती.

पन्हाळ्यात नव्यानेच बांधण्यात आलेल्या मुख्य रस्त्याच्या ठिकाणी दिवसभर सेल्फी पॉईंटमुळे व नव्या रस्त्यावर पर्यटक थांबून फोटो घेत असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती, तसेच बाजीप्रभू चौकात असणार्‍या रस्त्यावरील चहाच्या टपर्‍या व पर्यटकांच्या गाड्या पार्किंगसाठी नसलेली जागा यामुळे पर्यटक रस्त्यावरच गाड्या पार्क करत असल्याने वाहतूक खोळंबत होती. पर्यटकांनी गाड्या रस्त्यावरच पार्क केल्याने चारचाकी वाहने जाऊ शकत नाहीत. पार्किंगला अन्य ठिकाणी जागा नसल्याने पर्यटक रस्त्यावरच गाड्या पार्क करत आहेत, त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे.

मात्र, यावर पन्हाळा नगरपालिका तसेच पन्हाळा पोलिस ठाण्याकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. पोलिसांसमोर चारचाकी गाड्या रस्त्यावरच थांबवून लोक फोटो घेत असल्याने वाहतूक कोंडी होत असताना पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. याविषयी नागरिकांतून नाराजी व्यक्‍त होत आहे. पर्यटकांसाठी विविध सुविधा केल्या आहेत. मात्र, नागरिकांना याचा त्रास होत असल्याने नागरिकांतून तीव— संताप व्यक्‍त होत आहे.

रस्त्यावर पार्किंग केली जाणारी वाहने, प्रवासी कर नाक्यावर गाड्या थांबून घेतली जाणारी सेल्फी आणि फोटोशूट, तर चौकाचौकांत असलेल्या चहा टपर्‍या आणि त्यामुळे होणारी गर्दी याचा नागरिकांना त्रास होत आहे. नगरपालिकेमार्फत लवकरात लवकर याबाबत योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत, तर पन्हाळा पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन लावावे व वाहतूक कोंडी थांबवावी, अशीही मागणी होत आहे.

SCROLL FOR NEXT