कोल्हापूर ; सुनील सकटे : जिल्ह्यातील धरणांमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात तब्बल सरासरी 65 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणी काहीअंशी कमी आहे. असे असूनही केवळ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डोळेझाकपणामुळे प्रदूषणाची दाहकता कमी करण्यासाठी पंचगंगा नदीत पाणी सोडून नदी धुण्याची अर्थात 'वॉशआऊट' करण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, पंचगंगा नदी प्रदूषणाचा फटका पाटबंधारे विभागास बसत असून शेकडो क्युसेक अतिरिक्त पाणी सोडण्याची वेळ आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गलथानपणा आणि कामचुकारपणामुळे नदी वॉशआऊट करण्याची वेळ आली; मात्र नदी वॉशआऊटची चैन न परवडणारी आहे. उन्हाळ्याळ्या तोंडावर अशी पाण्याची चैन प्रत्येकवेळी शक्य असेलच असे नाही, असे पाटबंधारे विभागातील अधिकार्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध धरणांत यंदा चांगला पाणी साठा आहे. विविध धरणातील साठा द.ल.घ.मी.मध्ये असा ः राधानगरी धरणात यंदा 145.60 द.ल.घ.मी. पाणी आहे. गतवर्षी 144.12 साठा होता. तुळशी यंदा 72.08, तर गतवर्षी 73.48, वारणा यंदा 504.62, तर गतवर्षी 522, दूधगंगा यंदा 454.64, तर गतवर्षी 410.99, कासारी यंदा 50.97, तर गतवर्षी 41.83, कडवी यंदा 42.42, तर गतवर्षी 50.13, कुंभी यंदा 60.30, तर गतवर्षी 48.24, तर पाटगाव यंदा 71.70, तर गतवर्षी 71.72.
पंचगंगा नदी प्रदूषणामुळे गेल्या महिनाभरात लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. चारच दिवसांपूर्वी वळिवडे येथील सुर्वे बंधारा येथे प्रदूषणामुळे लाखो मासे मृत्युमुखी पडले. एका कारखान्यातून अपघाताने रसायनयुक्त पाणी थेट नदीत जाऊन ही घटना घडली. मेलेल्या लाखो माशांचा खच दोन दिवस त्याच ठिकाणी होता. यामुळे मासे सडून दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पाटबंधारे विभागास नदी वॉशआऊट करण्याची वेळ आली. नदी वॉशआऊट करण्यासाठी पाटबंधारे विभागाने 850 क्युसेक पाणी सोडले. ऐनवेळी एवढे पाणी सोडणे न परवडणारे आहे. त्यामुळे या पाण्याची भरपाई रक्कम प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांच्या वेतनातून कपात करावी, अशी मागणी होत आहे.
1.नदी वॉशआऊटची रक्कम 'प्रदूषण'च्या अधिकार्यांच्या वेतनातून कपात करण्याची मागणी
2. गतवर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये यंदा पाणी काहीअंशी कमी