कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : करिअरसंदर्भातील क्षेत्रात विविध पर्याय निर्माण झाले आहेत. आता स्पर्धेच्या काळात एकच पदवी व कॉलेज, खासगी क्लासेसवरदेखील अवलंबून राहून चालणार नाही. नवनिर्मितीचा ध्यास, स्वत: शिकण्याची जिद्द याबरोबरच चांगला कोर्स, कॉलेज निवडणे ही जीवनात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे, असे मत न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन पुणेचे संचालक डॉ. भूषण केळकर यांनी व्यक्त केले.
दै. 'पुढारी' आयोजित व संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत 'एज्युदिशा-2022' शैक्षणिक प्रदर्शनात 'आपले करिअर कसे घडवावे?' याविषयावर बोलत होते. याप्रसंगी डॉ. केळकर यांनी इंडस्ट्री 4.0 बद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देत विविध क्षेत्रातील संधीची उपलब्धता सांगितली. करिअर करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा, याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
ते म्हणाले, कोरोनानंतर शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले आहेत. फार वेगळ्या विषयात करिअर करणारे विद्यार्थांनी बदलत्या इंडस्ट्रीचा विचार करणे गरजेचे आहे. करिअर निवडताना बेसावध राहून चालणार नाही. आपण घेतलेला कोर्सला पुढील 15 वर्षांत किती स्कोप आहे, याचा विचार विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. चीनमध्ये प्राथमिक शिक्षणापासून इंडस्ट्री 4.0 चे शिकविले जाते. परंतु भारतात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती नाही, ही वस्तुस्थिती आहे. मुळात भारतीय विद्यार्थी न समजेल्या प्रश्नावर विचार करीत नाही. मळलेल्या वाटेने जात मोठे होण्याचे स्वप्न पाहतात. याउलट परदेशातील मुले अगदी सोप्या पद्धतीने शिकतात, त्यांचे ध्येय मोठे ठेवतात व त्यामध्ये यशस्वी होतात. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने केलेल्या सर्व्हेनुसार बदलत्या स्पर्धेच्या युगात शाळा, कॉलेजमधील ज्ञानावर अवलंबून राहता येणार नाही. त्यांना डोळसपणे सगळ्या गोष्टी स्वत: शिकाव्या लागणार आहेत. येणार्या काळात विद्यार्थ्यांना गुगल, डेटा अनालिटिक्स शिकावे लागणार आहे. इंग्रजीबरोबर परदेशी भाषा अवगत करून यशस्वी करिअर करावे लागणार आहे.