कोपार्डे / शिरोली दुमाला, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कुडित्रेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष चंद्रदीप नरके यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. दुसर्या फेरीअखेर नरके गटाच्या 22 उमेदवारांनी आघाडी घेतली. गट क्रमांक 2 मधून विरोधी पॅनेलचे राजेंद्र सूर्यवंशी यांनी 6681 मते घेऊन आव्हान कायम राखले होते.
पहिल्या फेरीत विरोधी राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलचे 18 उमेदवार तर सत्ताधारी नरके पॅनेलचे 5 उमेदवार आघाडीवर राहिले. पहिल्या फेरीत करवीर तालुक्यातील 18 गावांतील 35 केंद्रांची मतमोजणी झाली. या गावांतून विरोधी पॅनेलला 100 ते 500 च्या फरकाने आघाडी मिळाली. दुसर्या फेरीदरम्यान सत्ताधारी नरके गटाने विरोधी पॅनेलचे मताधिक्य तोडून आघाडी घेण्यास सुरुवात केली.
कुंभी कारखान्यासाठी रविवारी अत्यंत चुरशीने 82.45 टक्के मतदान झाले. मंगळवारी शासकीय बहुद्देशीय हॉल रमणमळा येथे 35 टेबलवर मतमोजणी सुरू झाली. 25 व 50 चे गट्ठे करत साडेनऊच्या सुमारास प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीतील उत्पादक सभासद प्रतिनिधी गट क्र.1 मधील कल विरोधी पॅनेलच्या बाजूने राहिला.
पहिल्या फेरीत समाविष्ट करवीर तालुक्यातील 18 गावांतील मतमोजणी झाली. या गावांतून विरोधी पॅनेलला यापूर्वीच्या निकालात लक्षवेधी मताधिक्य असायचे. मात्र यावेळी विरोधी पॅनेलला उमेदवारनिहाय सुमारे 100 ते 500 च्या दरम्यान मताधिक्य राहिले. विरोधी पॅनेलकडून
या फेरीत एक हजार ते पंधराशेपर्यंतचे मताधिक्य मिळेल, असा अंदाज बांधला गेला होता. मात्र प्रत्यक्षात त्यामध्ये घट झाल्याचे पहायला मिळाले.
सायंकाळी 6 वाजता दुसर्या फेरीमध्ये करवीर तालुक्यातील 13 आणि पन्हाळा तालुक्यातील 5 गावांच्या 35 केंद्राच्या मतमोजणीला प्रारंभ झाला. विरोधी पॅनेलला मिळालेले पहिल्या फेरीतील 100 ते 500 चे मताधिक्य तोडून नरके पॅनेलचे बहुतांश उमेदवार दुसर्या फेरीत सुमारे 300 मतांच्या फरकाने आघाडीवर राहिले.
पहिल्या फेरीत राजेंद्र सूर्यवंशींना सर्वांधिक मते…
पहिल्या फेरीअखेर विरोधी पॅनेलचे राजेंद्र सूर्यवंशी यांना 3 हजार 900 एवढी सर्वांधिक मते मिळाली. त्याखालोखाल भटक्या विमुक्त जाती जमाती प्रतिनिधी गटातून विरोधी पॅनेलचे बाबुराव रानगे यांना 3 हजार 724 मते तसेच सत्ताधारी नरके पॅनेलचे प्रमुख अध्यक्ष चंद्रदीप नरके यांना 3 हजार 626 मते मिळाली.
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात विरोधकांना धक्का
आजवरच्या कुंभी कारखान्याच्या निवडणुकीत जुन्या सांगरुळ विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये विरोधी पॅनेलला मोठे मताधिक्य राहिले होते. काँग्रेसचा बाल्लेकिल्ला असलेल्या या गावांतून हे मताधिक्य या निवडणुकीतही कायम राहील, किंबहुना यामध्ये वाढच होईल, असा अंदाज व्यक्त करीत विरोधी पॅनेलकडून विजयाचे गणित मांडले जात होते. मात्र अपेक्षेपेक्षा या मताधिक्यात घट झाल्याचे पहिल्या फेरीअखेर दिसून आले.
दिवसभर मतमोजणी केंद्राबाहेर शुकशुकाट…
स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी केंद्राबाहेर समर्थक कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असते. परंतु कुंभी कारखान्याची ही मतमोजणी उशिरापर्यंत चालणार असल्याने मतमोजणी केंद्राबाहेर दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांशिवाय कोणीही समर्थक रस्त्यावर दिसत नव्हते.