कोल्हापूर

ध्येय निश्चित करून त्याचा पाठलाग करा : भोसले

मोहन कारंडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : आयुष्यात ध्येय निश्चित असणे अत्यावश्यक आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे ध्येय रोज बदलते. यामुळे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. किंबहुना आजच्या स्पर्धेच्या युगात ही काळाची गरज आहे, असे आवाहन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थी व पालकांना केले.

दै. 'पुढारी' आयोजित 'एज्युदिशा 2022' या शिक्षणविषयक प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर विनायक भोसले यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी कोणी सांगितले म्हणून नव्हे तर आपले स्वत:च्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यातील ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. ते साध्य करतानाची वाटचाल नेहमीच पॉझिटिव्ह असावी. मनात धावणार्‍या दोन घोड्यांपैकी पॉझिटिव्ह घोड्याला खतपाणी घालून निगेटिव्ह घोड्याला मागे टाकले पाहिजे. 'ऑल इज वेल' अशी मानसिकता ठेवून रक्तगट कोणताही असो 'बी-पॉझिटिव्ह' राहिले पाहिजे. जीवनाची परीक्षा जिंकण्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवा. हस्तरेषा, नशीब या गोष्टीऐंवजी स्वत:च्या कार्य-कर्तृत्वाला महत्त्व द्या.

आयुष्यभर शिकायचे आहे…
जीवनात काहीतरी चांगले साध्य करणारच, हा अ‍ॅटिट्यूड प्रत्येकात असणे गरजेचे आहे. याचबरोबर कायम काहीतरी नवे शिकण्याची, ऐकण्याची आणि त्यानुसार बदलणे अत्यावश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे 'टाईम मॅनेजमेंट' असून, आजचे काम आजच करा, उद्यावर ढकलू नका. विद्यार्थी स्वत:तील बदल स्वत:च ओळखू शकतात. ते गुगलवर सर्च करता येत नाहीत. 'हार्ड वर्क' ला 'स्मार्ट वर्क'ची जोड अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर पाठीवर 'एल' (लर्निंग) बोर्ड हवा. कारण, आपणाला आयुष्यभर शिकायचे असल्याचे भोसले यांनी सांगितले.

दै. 'पुढारी'चा स्तुत्य उपक्रम
दै. 'पुढारी'च्या एज्युदिशा उपक्रमात संजय घोडावत विद्यापीठ गेल्या पाच वर्षांपासून सहभागी होत आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी मार्गदर्शन ठरणारा राज्यव्यापी स्तुत्य आणि शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांना जोडणारा हा उपक्रम आहे. या शिक्षणविषयक मार्गदर्शक उपक्रमाचा लाभ प्रत्येक विद्यार्थी व पालकांनी आवर्जुन घ्यावा, असे आवाहन विनायक भोसले यांनी केले.

SCROLL FOR NEXT