कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कर्जाची नियमित परतफेड करणार्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 2 लाखांपर्यंत शेतकर्यांना दिवाळीपूर्वी प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे. यासाठी सरकारच्या पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. यामुळे गेली चार वर्षे प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांना दिलासा मिळेल, असे चित्र आहे.
राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारने सत्तेवर आल्यानंतर थकबाकीदार शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. त्या माध्यमातून दोन लाखांपर्यंत कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांची कर्जमाफी करण्यात आली. त्यावेळी जिल्ह्यातील 47 हजार 839 शेतकर्यांची 285 कोटींची कर्जमाफी झाली. मात्र, नियमित कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना काय, असा प्रश्न उपस्थित झाला. अशा शेतकर्यांसाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता; पण कोरोनामुळे ही प्रक्रिया थांबली होती. कोरोना कमी झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने याची प्रक्रिया सुरू केली होती; पण राज्यात सत्तानाट्य घडले आणि महाविकास आघाडी सरकार जाऊन त्या ठिकाणी शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना पैसे देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
यासंदर्भात पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यातील सहकार विभागाने नियमित कर्जाची परतफेड करणार्या सुमारे 3 लाखांवर शेतकर्यांची यादी शासनाकडे सादर केली आहे. या यादीतून पात्र शेतकर्यांची यादी तयार होणार आहे. ही यादी ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाला प्राप्त होईल, त्यानंतर पात्र शेतकर्यांचे आधार प्रमाणिकरण होईल. त्यानंतर संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यावर पैसे वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.