कोल्हापूर ; सचिन टिपकुर्ले : देशात कोरोनाचे सावट काही प्रमाणात कमी झाल्याने वाहन उद्योगात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दसर्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला ग्राहक पसंती देत असल्याने यंदा दुचाकी, चारचाकी वाहनांच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कार ही आता केवळ चैनीची वस्तू नसून, ती गरज बनली आहे. त्यामुळे स्वत:च्या मालकीचे चारचाकी वाहन असावे, असे अनेकांचे स्वप्न असते. या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्याचा मुहूर्त साधला जातो. सध्या बाजारपेठेत विविध कंपन्यांच्या चारचाकी कार आणि मोटारसायकल्स, मोपेडचे पर्याय ग्राहकांसमोर उपलब्ध होते. दसर्याच्या मुहूर्तावर वाहन घरी घेऊन जाता यावे, यासाठी घटस्थापनेपासूनच ग्राहकांनी शोरूम्समध्ये चौकशीला प्राधान्य दिले आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे वाहन उद्योग बंदच होता. उत्पादन सुरू असले तरी त्याच्या विक्रीवर निर्बंध होते, याच काळात ई-बाईक व बॅटरीवरील चारचाकी वाहने शहरातील रस्त्यांवर दिसू लागल्याने ग्राहक या ई-व्हेईकलकडेही आकर्षित होत आहेत. या वाहनांची चौकशी करणार्या ग्राहकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक कंपन्यांनी फायनान्स योजना सुरू केली आहे. त्याचा लाभही ग्राहक घेताना दिसत आहेत. शोरूममधील ग्राहकांची रेलचेल पाहता वाहन वितरकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. (क्रमश:)
इंधनाचे वाढते दर ध्यानात घेऊन अनेक ग्राहक ई-बाईकला प्राधान्य देत आहेत. अनेक कंपन्यांनी आकर्षक डिझाईनच्या बाईक्स तसेच मोपेड तयार केल्या आहेत. या बाईक्स कॉलेज विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरत आहेत. नामांकित कंपन्याही आता ग्राहकांची मागणी ध्यानात घेऊन ई-बाईकचे उत्पादन वाढवत आहेत.