कोल्हापूर

त्यांनी जपली मातीशी नाळ..!

दिनेश चोरगे

कोल्हापूर; अनिल देशमुख :  शालेय क्रीडा स्पर्धेतूनच पुढे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतात. मात्र, हा प्रवास सहजासहजी नसतो. त्यामागे मेहनत, कष्टाबरोबर आर्थिक ताकदही महत्त्वपूर्ण ठरते. क्षमता, प्रतिभा असूनही अनेक जणाचा प्रवास आर्थिक अडचणींमुळे पहिल्या टप्प्यावरच खंडित होतो. अशा मुलांचे खेळात भवितव्य घडवण्याचे पाहिलेले स्वप्न भंग होऊ नये, यासाठी स्वत: खेळाडू असलेल्या आणि स्पोर्टस् कोट्यातून नोकरी मिळालेल्या पाच तरुणांनी शालेय क्रीडा स्पर्धेसाठी रोख शिष्यवृत्ती सुरू केली आहे. त्यांच्या या उपक्रमाने त्यांनी आपली नाळ मातीशी अजूनही जुळली असल्याचे सिद्ध केले आहे.

रेल्वेत मुख्य तिकीट निरीक्षक असलेले सचिन पाटील, नायब तहसीलदार असलेले अमित निंबाळकर, आयकर खात्यात असलेले किरण डोईफोडे, मुख्याधिकारी हेमंत किरोळकर आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत अमोल पाटील यांनी दरवर्षी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत मैदानी खेळातील धावणे आणि गोळाफेक प्रकारातील 14, 17 आणि 19 वर्षांखालील गटातील पहिल्या तीन क्रमांकाना रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता दरवर्षी ते 60 हजार रुपये खर्च करणार आहेत.
खेळातून मोठे झालेल्यांनी किमान आपल्या खेळासाठी जरी अशा प्रकारचे उपक्रम राबविले, तर उदयोन्मुख खेळांडूना मोठे प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पालकांची परिस्थिती नसल्याने खेळ अर्धवट सोडावा लागतो, अशी परिस्थिती खेळाडूवर येऊ नये, त्याला काही आर्थिक मदत व्हावी. आम्हाला खेळाडू संवर्गातून नोकरी मिळाली, खेळाने आम्हाला भाकरी दिली, त्या खेळाची सेवा म्हणून, भविष्यात चांगले खेळाडू घडावे याकरिता हा उपक्रम सुरू केला आहे.
– सचिन पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT