कोल्हापूर

डॉ. वीरेंद्र तावडे, अंदुरे, कळसकरसह 10 आरोपींवर 23 रोजी होणार दोषनिश्‍चिती

backup backup

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरेसह 10 संशयित आरोपींविरुद्ध 23 ऑगस्टला दोषनिश्‍चिती करण्यात येणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर सुरू असलेल्या सुनावणीसाठी फरारी संशयित विनय पवार, सारंग अकोळकर वगळता दहाही संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांच्या परवानगीने कुटुंबीयांनी संशयितांची भेट घेतली.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपींविरुद्ध शुक्रवारी सरकारी पक्षामार्फत दोषनिश्‍चिती करण्यात येणार होती. मात्र पानसरे कुटुंबीयांच्या मागणीनुसार हत्येचा तपास 'एसआयटी'कडून 'एटीएस' कडे सोपविण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत अद्याप उपलब्ध झाली नाही. निकालपत्राच्या पडताळणीसाठी काही काळ मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी न्यायालयांकडे केली. ती मागणी मान्य झाल्याने दोषनिश्‍चिती प्रक्रिया 23 ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली.
फरारी संशयित वगळता 10 संशयित कोर्टात

27 जुलै रोजी झालेल्या सुनावणीवेळी हत्येतील सर्वच संशयितांना न्यायालयात हजर करण्याचे निर्देश न्यायाधीश तांबे यांनी दिले होते. फरारी विनय बाबूराव पवार, सारंग दिलीप अकोळकर वगळता मुख्य संशयित डॉ. वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे, समीर विष्णू गायकवाड, अमोल अरविंद काळे, वासुदेव भगवान सूर्यवंशी, भारत जयवंत कुरणे, अमित रामचंद्र डेगवेकर, शरद भाऊसाहेब कळसकर, सचिन प्रकाशराव अंदुरे, अमित रामचंद्र बद्दी, गणेश दशरथ मिश्किन यांना दुपारी पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायाधीश तांबे यांच्यासमोर सुनावणी सुरू होताच विशेष सरकारी वकील अ‍ॅड. राणे यांनी कॉ. पानसरे हत्येचा तपास 'एटीएस'कडे वर्ग करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे लक्ष वेधले. कॉ. पानसरे यांची हत्या होऊन 7 वर्षे झाली तरी तपास यंत्रणांना मास्टर माईंडचा छडा लागला नाही व दोन फरारी मारेकरीही हाती लागलेले नाहीत.

'एसआयटी'कडून संथ गतीने तपास

एसआयटी पथकाकडून संथ गतीने तपास सुरू असल्याने गुन्ह्याचा तपास 'एटीएस'कडे सोपविण्यासाठी पानसरे कुटुंबीयांची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. मात्र आदेशाची प्रत मिळून त्याची पडताळणी झाल्यानंतर दोष निश्‍चितीची प्रक्रिया होणे योग्य ठरेल, असा युक्‍तिवाद अ‍ॅड. राणे यांनी केला. तसे लेखी म्हणणेही न्यायालयाला सादर केले. संशयित आरोपीचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांच्या युक्‍तिवादानंतर मंगळवार, दि. 23 ऑगस्टला खटल्याची पुढील सुनावणी होईल, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.

6 जणांना बंगळुरातून, तिघांनापुण्यातून बंदोबस्तात आणले

न्यायाधीश तांबे यांच्या आदेशानुसार 10 संशयितांपैकी अमोल काळे, वासुदेव सुर्यवंशी, भारत कुरणे, अमित बद्दी, अमित डेगवेकर, गणेश मिस्कीन याना बंगळूर येथून तर डॉ.वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरेला पुणे येथून न्यायालयात हजर करण्यात आले होते.
बंगळूरहून कोल्हापूरला आणताना पोलिसांनी सहाही संशयितांच्या हाताला बेड्या ठोकल्या होत्या. दंडाला दोरीने बांधलेले होते. नैसर्गिक विधीसाठीही पोलिसांनी वाटेत वाहने थांबविली नाहीत. त्यामुळे प्रवासात फार त्रास सहन करावा लागला आहे, अशी तक्रार संशयित अमित बद्दी, अमित डेगवेकर यांनी वकील अ‍ॅड. पटवर्धन यांच्यामार्फत न्यायाधीश तांबे यांच्याकडे केली. न्या. तांबे यांनी तक्रारीची दखल घेत सुरक्षा पथकातील अधिकारी व पोलिसांना समज दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT