कोल्हापूर; प्रवीण मस्के : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बारावीनंतर चार वर्षांचा शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम बी.एड.चा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच आता डी.एड. अभ्यासक्रम कालबाह्य होणार असून जिल्ह्यातील 19 डी.एड. महाविद्यालयांना टाळे लागण्याची शक्यता आहे.
बारावी झाल्यानंतर डी.एड.ची परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षक होण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत शिक्षण पद्धतीमधील बदलामुळे डी.एड. महाविद्यालयांना घरघर लागली आहे. दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवूनही शंभर टक्के प्रवेश होत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळेच काही महाविद्यालये बंद झाली आहेत. सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार प्राथमिक शिक्षक होण्यासाठी बारावी व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक होण्यासाठी बी.एड. करावे लागते. जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी 45 डी.एड. महाविद्यालये होती. दरवर्षी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने डी.एड.ला प्रवेश वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या 19 डी.एड. महाविद्यालये आहेत. यावर्षी 550 हून अधिक प्रवेश झाले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात शिक्षण व शिक्षक प्रशिक्षणाचे टप्पे बदलणार आहेत.
या धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी इंटिग्रेटेड बी.एड. डिग्री कोर्स असणार आहे. अध्यापनात नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून नव्या गोष्टींचा कोर्समध्ये समावेश केला आहे. नवीन अभ्यासक्रमामध्ये व्यवहारिक प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
डी.एड.चा कोर्स पूर्ण केल्यानंतर तत्काळ नोकरी असा एक काळ होता. अभ्यासक्रम प्रवेशासाठी रांगा पाहून नवीन खासगी, विनाअनुदान तत्त्वावरील डी.एड. महाविद्यालये सुरू केली. मात्र, 2012 पासून शिक्षक भरती प्रक्रिया नाही, टीईटी परीक्षेचा निकाल कमी, अभियोग्यता चाचणी वेळेवर होत नसल्यामुळे डी.एड. अभ्यासक्रमाकडील विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे.
डी.एड.अभ्यासक्रम बंद करण्याबाबत अद्याप अधिकृत राज्य व केंद्र शासनाचे पत्र प्राप्त झालेले नाही. नवीन शैक्षणिक धोरणात डी.एड.चे स्वरूप बदलेल, मात्र कॉलेज बंद होण्याची शक्यता वाटत नाही.
– डॉ. आय.सी.शेख, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट)