कोल्हापूर

टँकर बंद केल्यामुळेच महाडिकांचे आरोप : अरुण डोंगळे

Arun Patil
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गोकुळधील 45 टँकर बंद केल्यामुळे आर्थिक फायदा थांबला असल्याच्या कारणावरून शौमिका महाडिक गोकुळवर आरोप करत आहेत, असे पत्रक गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मंगळवारी प्रसिद्धीस दिले आहे. महाडिकांचे जावई विजय ढेरे यांचा दूध पॅकिंगचा ठेका रद्द केल्याचा राग आल्याने आरोप करण्यात येत असून गोकुळच्या दूध संकलनामध्ये गतवर्षीच्या तुलनेत प्रतिदिन 50 हजार लिटर तर मुंबईतील दूध विक्रीमध्ये गतवर्षाच्या तुलनेत वर्षाला 69 लाख लिटरची वाढ झाली आहे. पशुखाद्य विक्रीमध्ये 14 टक्के वाढ झाल्याचेही  पत्रकात म्हटले आहे.
चुकीची माहिती देऊन दूध उत्पादकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न शौमिका महाडिक यांनी थांबवावा. त्यांच्याकडून होत असलेली गोकुळची बदनामी दुर्दैवी आहे. वाढत्या रहदारीमुळे कोल्हापुरातून मांजरी येथील गायत्री कोल्ड स्टोरेज प्लांटपर्यंत  पोहोचण्यास दुधाच्या गाड्यांना वेळ होत होता. यामुळे वितरकांना वेळेत दूध मिळत नव्हत म्हणून गोकुळने किकवीतील अनंत प्लांटला नियमानुसार दूध पॅकिंगचा ठेका दिला. यामुळे चार कोटींची बचत होत आहे. गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यापासून दूध संकलनाबरोबरच पशुखाद्य विक्री वाढीसाठी देखील जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या अडीच वर्षांत पशुखाद्याच्या मागणीत म्हणजेच विक्रीत 14 टक्क्यांने वाढ झाल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
मुंबईतील दूध विक्री कमी झाल्याचे संचालिका महाडिक सांगतात, पण गेल्या दोन वर्षांतील  दूध विक्रीचा आढावा घेतला तर गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईच्या विक्रीमध्ये वार्षिक 69 लाख लिटर्सची वाढ झाल्याचे दिसते. याचाच अर्थ प्रत्येक दिवशी 18 हजार 935 लिटर इतकी दूध विक्री वाढ झालेली आहे. अमुल सारख्या ब—ँडचे आव्हान असताना गोकुळ वाढविण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत, असेही  पत्रकात म्हटले आहे.
दूध संस्था मंजुरीच्या प्रक्रियेबद्दल महाडिक अज्ञानी
नवीन दूध संस्थांना कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच सहायक निबंधकांकडून (दुग्ध) मंजुरी दिली जाते. परंतु याबाबत त्यांनी केलेल्या आरोपावरून संस्था मंजुरीच्या प्रक्रियेबद्दल महाडिक यांचे अज्ञान दिसून येते.
गोकुळ विरोधात उच्च न्यायालयाचा कोणताही निर्णय नाही
महाडिक यांच्या जावयांच्या प्लांटबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सूचना देऊनही त्यांनी सुधारणा न केल्यामुळे त्यांचा ठेका रद्द केला. उच्च न्यायालयाने गोकुळच्या विरोधात कोणताही निर्णय दिलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ठळक बाबी  
वार्षिक उलाढाल 2550 कोटींवरून 3420 कोटींवर.  सात वेळा दूध खरेदी दरात वाढ. यात म्हैस दुधासाठी 10 तर गाय दुधासाठी 11 रुपये दरवाढ.  दूध दर फरकापोटी 102 कोटी 83 लाख रुपये दूध संस्थाच्या खात्यावर जमा. गेल्या वर्षीच्या तुलनेत 19 कोटी जादा रक्कम.  फ्लश सीजनमध्ये 17 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण.   जातिवंत म्हैस खरेदी अनुदानात 5 हजारची वाढ.
 वाशीतील दुग्ध शाळेचे विस्तारीकरण.    नवीन  पेट्रोल पंपास मान्यता.
SCROLL FOR NEXT