कोल्हापूर

जिल्हा बँक निवडणूक : महाविकास आघाडी-भाजपमध्ये लढत शक्य

Arun Patil

कोल्हापूर ; डी. बी. चव्हाण : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून प्रयत्न सुरू आहेत. गोकुळ निवडणूक, त्यानंतर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी निवडीच्यावेळी बांधलेली मोट, याचा विचार करता महाविकास आघाडीला सत्ता राखण्यास अडचणी वाटत नाहीत; पण सत्तारुढची चाल लक्षात घेऊन विरोधी भाजपच्या वतीने ही जिल्हा बँक निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ द्यावयाची नाही, यासाठी भाजप नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.

यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजप नेत्यांनी तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक कधी होणार हे गुरुवारी (दि. 12) होणार्‍या सहकार प्राधिकरणाच्या बैठकीत ठरणार आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन 31 ऑगस्टनंतर जिल्ह्यातील नागरी बँका, सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत आदेश निघू शकतात. त्यासाठी गुरुवारी पुण्यात होणार्‍या प्राधिकरणाच्या बैठकीत काय ठरते, यावर निवडणुकीबाबत आडाखे ठरणार आहेत.

जिल्हा बँकेची निवडणूक मार्च 2021 मध्ये जाहीर झाली होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन शासनाने जिल्हा बँकांसह सर्वच संस्थांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. आता शासनाने या निवडणुका घ्या, असे आदेश काढले आहेत. सध्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी पात्र संस्थांकडून ठराव दाखल करून घेण्यात आले आहेत. 11 हजार 448 पैकी 8 हजार 500 सभासदांनी ठराव दाखल केले आहेत.

या ठरावांची प्रारुप यादी तयारी करण्यासाठी विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडून जिल्हा बँकेला दिली आहे; पण सहकार निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत तो निर्णय जाहीर होईल. त्यानंतर जिल्हा बँकेकडून प्रारुप मतदार यादी जाहीर होईल, त्यावर हरकती, या हरकतीवर सुनावणी होईल. त्यानंतर अंतिम यादी व निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी निवडणूक प्रक्रिया होणार आहे.

राजकीय समीकरणे अशी राहतील

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे बिनविरोधचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असल्याने 'गोकुळ'च्या निवडणुकीत मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांना एकत्र आणत 'गोकुळ'ची निवडणूक जिंकली. त्यावेळी आ. पी. एन. पाटील विरोधात होते.

मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी त्यांच्या मुलाला अध्यक्ष करण्यास मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांचे प्रयत्न कामी आले. मात्र, 'गोकुळ'मध्ये आ. पाटील यांच्याबरोबर असलेले महादेवराव महाडिक जिल्हा बँक निवडणुकीत ते कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

गेल्यावेळी बँक व पतसंस्था गटातून विरोधी गटातील अनिल पाटील हे भाजपचे एकमेव संचालक जिल्हा बँकेत निवडून गेले होते. पाच वर्षांत त्यांनी सत्तारुढ गटाशी जुळवून घेऊन काम केले. त्यामुळे त्यांची भूमिका काय राहणार हे महत्त्वाचे आहे. तसेच महाविकास आघाडीतून जि.प.चे माजी सदस्य प्रा. अर्जुन आबिटकर इच्छुक आहेत. महिला आघाडीतून अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे सत्तारुढ गटातील महिला उमेदवारात बदल होण्याची शक्यता आहे.

संभाव्य गटातून हे लढतील

संस्था गटातून गगनबावडा येथून पी. जी. शिंदे विरुद्ध पालकमंत्री सतेज पाटील, शाहूवाडीतून सर्जेराव पाटील-पेरिडकर विरुद्ध मानसिंगराव गायकवाड, शिरोळमध्ये मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विरुद्ध विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, आजर्‍यात सुनील देसाई विरुद्ध अशोक चराटी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT