कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा
जयप्रभा स्टुडिओबाबत यापूर्वी जे झाले आहे, त्याविषयी आता चर्चा नको. राज्य शासनाकडे बैठक झाल्याशिवाय यावर तोडगा निघणार नाही. त्यामुळे नगरविकास व सांस्कृतिक कार्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक घेऊ व तसे पत्र आजच देऊ, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी सांगितले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे प्रतिनिधी त्यांना भेटले. त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूरची अस्मिता असणार्या जयप्रभा स्टुडिओची जागा संबंधितांना टीडीआर स्वरूपात मोबदला देऊन कोल्हापूर मनपाच्या ताब्यात द्यावी, असे निवेदन त्यांना देण्यात आले. जयप्रभाबाबत अपेक्षित निर्णय होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपण नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देतो. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, खा. संजय मंडलिक, राजेश क्षीरसागर, महामंडळाचे पदाधिकारी आणि आयुक्त यांची संयुक्त बैठक लवकरच घेऊ, असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. हेरिटेज वास्तू आणि चित्रीकरणासाठी आरक्षित जागेची 2020 साली विक्री झाली. या जागेत कोणतेही बांधकाम करता येणार नाही, असा ठराव कोल्हापूर मनपाने केला आहे. कोल्हापूरची अस्मिता असलेला जयप्रभा स्टुडिओ ही ऐतिहासिक वास्तू अबाधित राहावी, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी धनाजी यमकर, रणजित जाधव, मिलिंद अष्टेकर, आनंद काळे, अमर मोरे, राहुल राजशेखर, राजू पोळ, बाबा पार्टे, भूपाल शेटे आदी उपस्थित होते.