कोल्हापूर

‘चिमण्यांनो… परत फिरा रे…’ दक्षिणेतील ’माऊली’ला कोल्हापुरात मिळाली सावली

मोहन कारंडे

कोल्हापूर; पूनम देशमुख : त्यांना दोन मुले. एक मुलगा अन् मुलगी, दोघेही विवाहित आणि नोकरीनिमित्त कुटुंबासह परदेशात स्थायिक झालेले. आईलाही सोबत नेण्याचा प्रयत्न होता; पण डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना भारतात ठेवणे भाग पडले. आज दोन वर्षे झाली आहेत, आई-मुलांची भेट झाली नाही. केवळ व्हिडीओ कॉलिंगद्वारे दररोज वृद्धाश्रमाच्या पायर्‍यांवर बसून या चिमण्यांनो परत फिरा… अशी भावनिक साद घालत उषादेवी दररोज येणार्‍या मुलांच्या फोनच्या रिंगकडे कान लावून बसलेल्या असतात.

मूळच्या दक्षिणेकडील एका शहरात उषादेवी सर्वसामान्यपणे जगल्या. पतीच्या साथीने मोठ्या कष्टातून मुलांना घडवलं. त्यांनीही आई-वडिलांच्या कष्टाचे मोल राखत परदेशात नोकरी मिळवली आणि लग्नानंतर ते तिकडे स्थायिक झाले. सुरुवातीच्या काळात काही दिवस परदेशात मुलांकडे हे दाम्पत्य राहायचे. मात्र, वयोमानानुसार हवामान आणि तेथील वातावरण त्यांना त्रासदायक ठरू लागल्याने त्यांनी येथेच राहणे पसंत केले. संधिवाताचा त्रास असणार्‍या उषादेवींच्या तब्येतीची काळजी त्यांचे पती घ्यायचे, मात्र सहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. एकट्या पडलेल्या आईचे काय करायचे, असा प्रश्न मुलांसमोर उभा होता आणि त्याचे उत्तर सोशल मीडियाद्वारे त्यांना कोल्हापुरातल्या सावली केअर सेंटरच्या माध्यमातून मिळाले. दोन वर्षांपूर्वी त्या सेंटरमध्ये दाखल झाल्या असून तेथील डॉक्टर, कर्मचारी वर्ग, सहकारी यांच्यामुळे त्यांना जणू मायेची सावली मिळाली. असे असले तरीही नातवंडे आणि मुलांच्या विरहात त्या आजही झुरत आहेत.
त्यांच्यावरील उपचाराचा सर्व खर्च त्यांची मुले करीत असून रोज सावली केअर सेंटरमधील डॉक्टरांशी संपर्क करून आईच्या तब्येतीची ते आवर्जुन विचारपूस करतात. आईला वयोमानानुसार आणि आजारपणामुळे फार काळ बोलता येत नसल्याने व्हिडीओ कॉलद्वारे एकमेकांना पाहून मातृत्वाची भूक उषादेवी भागवितात. तर दुसरीकडे आईच्या काळजीने मुलांचाही जीव टांगणीला लागल्याचे दिसते.

मी ठीक आहे, असे सांगा…

कोरोनाच्या परिस्थितीत आणि आर्थिक गणित सांभाळत भारतात सारखे येणे परवडण्यासारखे नाही. हे मुलांप्रमाणे आईलाही पटतंय. मुलांची आईसाठी होणारी तळमळ पाहून माझ्या मुलांना माझी तब्येत बरी नाही हे सांगू नका, त्यांना त्रास देऊ नका, मी ठीक आहे, असे त्या डॉक्टरांना सांगत असतात.

SCROLL FOR NEXT