इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा संस्थेची कागदपत्रे परत देण्यासाठी 50 लाख रुपयांची खंडणी मागून तडजोडीअंती 15 लाखांच्या खंडणीसाठी धमकी देणार्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक करण्यात आली. यामध्ये घोसरवाड येथील ग्रा.पं. सदस्य राकेश ऊर्फ अमोल प्रकाश कागले (वय 28) आणि विनायक बाळू माळी (30, दोघे रा.घोसरवाड) यांचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद मधुकर शामराव पाटील (58, रा. संग्राम चौक) यांनी दिली आहे.
संग्राम चौक येथे राहणारे मधुकर पाटील हे मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कचे संचालक आहेत, तर याठिकाणी विनायक माळी अकौंटंट होता, तर ग्रा.पं.सदस्य राकेश कागले हा शिपाई म्हणून काम करीत होता. संशयितांनी पाटील यांच्या घरी 7 किंवा 8 जून रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास तसेच 16 जून रोजी सकाळी 10 च्या सुमारास गेले. यावेळी त्यांनी संस्थेची महत्त्वाची मूळ कागदपत्रे, संगणक, लॅपटॉपमधील महत्त्वाचा डाटा पाटील यांच्या माघारी चोरी करून तो परत देण्यासाठी 50 लाखांची मागणी केली होती. दोघांनाही न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास स.पो.नि. भालचंद्र देशमुख करीत आहेत.