कोल्हापूर

ग्रामपंचायत रणांगण निकाल : राधानगरी तालुक्यात सर्वसामान्यांना सरपंचपदी संधी

मोहन कारंडे

राशिवडे : प्रवीण ढोणे/नंदू गुरव : पारंपरिक आणी वंशपरंपरागत घराण्यामध्ये अडकलेली सत्तेची केंद्रे लोकनियुक्त सरपंचपदामुळे पूर्णपणे ढासळलेली दिसून येत आहेत. अनेक नेत्यांचे बालेकिल्ले पूर्णपणे ढासळले असून मी म्हणेन ते या प्रवृत्तीला सर्वसामान्य जनतेने खिंडीतच रोखले आहे. लोकनियुक्त सरपंचपदाची संधी सामान्य जनतेने अचूकपणे उचलत या खुर्चीची संधी सर्वमान्य, सर्वसामान्यांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील 66पैकी 8 ग्रा.पं. बिनविरोध झाल्या असल्या तरी 58 ग्रा.पं.मध्ये नेत्यांना धक्का देणारा निकाल बाहेर पडला आहे. लोकनियुक्त सरपंचपदाची संधी उठवत परंपरागत राजकारण करणार्‍या नेत्यांना कात्रजचा घाट दाखविण्याचे काम सामान्य जनतेने केले आहे. तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणार्‍या कौलव गावामध्ये सर्व नेतेमंडळींच्या आघाडीला जबर धक्का देत चंद्रकांतदादा पाटील या उद्योजकाने सरपंचपदाची खुर्ची अनपेक्षितपणे खेचून धक्का दिला आहे.

राशिवडे ग्रा.पं.साठीही राष्ट्रवादीचे अविनाश पाटील, सतेज पाटील गटाचे मोहन धुंदरे, जि.प. सदस्य विनय पाटील गटाला धक्का देत गोकुळचे संचालक पी. डी. धुंदरे, कृष्णराव पाटील गटाने सता हस्तगत केली. ठिकपुर्लीमध्ये हिंदुराव चौगलेची परंपरागत पन्नास वर्षांची सत्ता राष्ट्रवादीच्या प्रल्हाद पाटील यांनी खेचली. राधानगरीमध्ये गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्टींनी सर्वपक्षीयांची बांधलेली मोट सपशेल अपयशी ठरली. राजू भाटळेंनी येथील सत्ता हस्तगत केली. घोटवडेमध्ये गोकुळचे संचालक अरुणक्षडोंगळेंना त्यांचाच पुतण्या धीरज डोंगळेंनी धोबीपछाड केले. गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगलेंनी मात्र पस्तीस वर्षांपासूनचा सत्तेचा गड राखला. येळवडेमध्ये भोगावतीचे संचालक विश्वनाथ पाटील यांची सत्ता आली असली तरी सरपंचपदाची माळ मात्र विरोधातील तेवीस वर्षीय ओंकार पाटोळेंच्या गळ्यात घालून धक्का दिला आहे.
लोकनियुक्त सरपंचपदामुळे ग्रा.पं. सदस्यांकडे दुर्लक्ष झाले असून मी सांगेल तो सरपंच प्रवृत्तीला जनतेनेच लगाम घालण्याचा प्रयत्न केला आहे. नेत्यांच्या विरोधात झालेल्या सोयीच्या आघाड्यांनी यशापर्यंत झेप घेतली आहे. या सर्व राजकीय घडामोडीचा आगामी जि. प., पं. स आणि कारखाना निवडणुकींवर परिणाम होण्याचे संकेत आहेत.

सरपंचपदाचे राजकीय बलाबल

राष्ट्रवादी……………….. 18
काँग्रेस………… ………..15
भाजप………………….1
शिवसेना शिंदे गट…………2
शिवसेना ठाकरे गट………..1
स्वराज्य संघटना………..1

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT