कोल्हापूर

गुडाळवाडीजवळ दरड कोसळली, वाहतूक बंद

Arun Patil

गुडाळ ; पुढारी वृत्तसेवा : गुडाळवाडी – राधानगरी मार्गावर जळचाई नदी घाटाजवळ रविवारी सकाळी नऊच्या सुमारास दरड कोसळली. त्यानंतर रस्ता वाहतुकीस बंद झाला. सुदैवाने दरड कोसळताना रस्ता निर्मनुष्य होता. त्यामुळे या घटनेत जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.

दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास दगड-माती हटवून रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र पुन्हा त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली. त्यामुळे रस्ता पुन्हा बंद झाला. ठेकेदार संजय पाटील यांनी जेसीबी आणि ट्रॅक्टर त्वरित तेथून हलवल्याने
अनर्थ टळला.

बारा वर्षापूर्वी प्रधानमंत्री सडक योजनेतून गुडाळवाडी – राधानगरी या आठ कि.मी. रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण झाले आहे. डोंगराजवळील रुंदीकरण करताना स्लोपिंग पद्धतीने खोदाई करण्यात आली नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात.

रविवारी सकाळी सातच्या दरम्यान दरडीचा थोडासा भाग कोसळला होता. नऊच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर दगड-माती रस्त्यावर आली. वाहतूक बंद झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अमित पाटील, शाखा अभियंता अशोक भोपळे यांनी दहा वाजता घटनास्थळी भेट दिली. रस्ता देखभाल दुरुस्ती करणारे ठेकेदार संजय पाटील यांना पाचारण केले. कोसळलेली दरड जेसीबीच्या सहाय्याने हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सायंकाळी पाचपर्यंत हा रस्ता चारचाकी वाहनांसाठी खुला झाला. मात्र पुन्हा मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली. शिवाय आणखी दरड कोसळण्याचा धोका होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर वाहतूक बंदचे फलक लावले आहेत. सोमवारी सकाळी दरड हटवण्याचे काम पुन्हा सुरू होईल, अशी माहिती शाखा अभियंता अशोक भोपळे यांनी दिली.

SCROLL FOR NEXT