कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : करवीर तालुक्यातील परिते येथील बेकायदेशीर गर्भलिंगनिदान सेंटर प्रकरणी एका महिलेवर कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित राणी कांबळे (वय ४५, राहणार कसबा तारळे, तालुका राधानगरी) हिला करवीर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली.
पोलिसांनी दोन दिवसापूर्वी परिते येथील गर्भलिंगनिदान सेंटरवर छापा टाकून यांना अटक केली होती. पोलिसांचा छापा पडताच राणी कांबळे पसार झाली होती.
उद्या (दि. २१) बुधवारी तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे असे पोलीस उपअधीक्षक आर आर पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर-राधानगरी राज्य मार्गाशेजारीच परिते (ता. करवीर) येथे एका घरात बेकायदेशीररीत्या गर्भलिंग तपासणी करण्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला.
करवीर पोलिसांनी छापा टाकून एका महिलेसह तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
परिते येथे जुन्या पेट्रोल पंपाशेजारी हमरस्त्यालगत साताप्पा खाडे यांच्या घरात गर्भलिंग तपासणी होत असल्याची माहिती करवीर पोलिस ठाण्याला मिळाली होती. त्यानुसार सकाळी नऊ वाजता पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी या ठिकाणी छापा टाकला.
या ठिकाणाहून एका उपकरणासह तिघांना ताब्यात घेतल्याचे समजते. या कारवाईवेळी करवीरचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुवर्णा पाटील, इस्पुर्ली आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारीडॉ. योगीता अग्रवाल उपस्थित होते.