कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : इमारत पाहून शिक्षण संस्थेची निवड करू नका. चार भिंतींच्या आत दिल्या जाणार्या शिक्षणाचा दर्जा ओळखा. कौशल्य, ज्ञान, क्षमता असणार्याच शिक्षण संस्थांची विद्यार्थ्यांनी निवड केली पाहिजे. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखून शिक्षण देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्याला काय करायचेय, हे स्वतः ठरविले पाहिजे. नेहमी स्वतःला अपटेड ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांनी केले.
दै.'पुढारी' आयोजित 'एज्युदिशा 2022' शिक्षणविषयक प्रदर्शनात 'उच्च शिक्षणाचे महत्त्व व संधी' या विषयावर ते बोलत होते. डॉ. पाटील म्हणाले, आपल्यामध्ये कौशल्य, क्षमता असते; पण पुढे काय करायचे हे सुचत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण देणार्या संस्था निवडल्या पाहिजेत, तरच आपण निश्चित ध्येय गाठू शकतो; पण आयुष्यात आपल्याला नमकं काय व्हायचं आहे, हे प्रथम ठरविले पाहिजे. पाहिलेली स्वप्ने सतत्यात उतरविण्यासाठी अपार कष्टाची तयारी ठेवा. स्वप्न पाहणे गैर नाही; पण ते साकारण्यासाठी धडपड महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नका. नवीन शिकण्यासाठी वेळ द्या. संधी खूप आहेत; पण त्यांचा शोध घेता आला पाहिजे. स्वतःमधील क्षमता ओळखून शिक्षण संस्थांची निवड करा. नवनवीन शैक्षणिक संधी आल्या आहेत, त्यासाठी डोळे उघडे ठेवा. शैक्षणिक धोरण माहीत असणे गरजेचे आहे. शिक्षण घेऊन परिपूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळाली नाही तरी चालेल; पण इतरांना नोकरी देण्यासाठी एखाद्या व्यवसायाची निवड करा. कठीण परिस्थितीत कष्टाची तयारी ठेवा. नाराज होऊ नका, धडपड करा, यश चालून येईल, असा मूलमंत्रही कुलगुरू डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.