कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : कोल्हापुरातील राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शैक्षणिक सुविधांमध्ये एक नवे पाऊल पडते आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रारंभानंतर आता राज्य शासनाने सीपीआर रुग्णालयातील हृदयशस्त्रक्रिया विभागांतर्गत 'डीएम कार्डिओलॉजी' (डॉक्टरेट इन मेडिसिन) हा अतिविशेषोपचार अभ्यासक्रम सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. याविषयीच्या प्रक्रियेसाठी आवश्यकता प्रमाणपत्र बहाल करण्यात आले असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी रेटा लावला, तर नव्या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रमही चालू होऊ शकतो.
राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याविषयी गेली काही वर्षे
दै. 'पुढारी'ने सतत पाठपुरावा केला होता. यातून वैद्यकीय महाविद्यालयातील 11 विषयांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.
यानंतर या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयशस्त्रक्रिया विभागांतर्गत 'डीएम कार्डिओलॉजी' हा अभ्यासक्रम सुरू करता येणे शक्य असल्याविषयीचे एक वृत्त दै. 'पुढारी'ने काही महिन्यांपूर्वी दिले होते. यानंतर हृदयचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय बाफना यांनी एक प्रस्ताव तयार करून प्रशासनामार्फत वैद्यकीय संचालकांकडे पाठविला होता. त्याला मूर्त स्वरूप आले आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्य शासनाच्या आवश्यकता प्रमाणपत्रानंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे संगलग्नता प्रमाणपत्र आवश्यक असून या प्रमाणपत्रासह राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अनुमती मागितली जाते. यानंतर आयोगाच्या तपासणी पथकाने हिरवा कंदील दाखविला, की अभ्यासक्रम सुरू करता येतो.
सध्या सीपीआर रुग्णालयातील हृदयशस्त्रक्रिया विभाग हा राज्यातील दुसर्या क्रमांकाचा विभाग समजला जातो. तेथे उपलब्ध सर्व पायाभूत सुविधा लक्षात घेतल्या तर केवळ सक्षम पाठपुरावा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आणखी एका नव्या दालनाचे दार उघडण्यास कारणीभूत ठरू शकतो.
राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाच्या मंजुरीसाठी पायाभूत सुविधांची खातरजमा करण्याकरिता गतवर्षी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे पथक कोल्हापुरात आले होते.
यावेळी 'एमडी मेडिसिन' या विषयाच्या पायाभूत सुविधा तपासताना आयोगाच्या पथकानेच सुविधांवर प्रभावित होऊन येथे 'डीएम कार्डिओलॉजी' हा अभ्यासक्रम सुरू करता येणे सहज शक्य आहे, असे मत व्यक्त केले होते. त्याचा सूर पकडत दै. 'पुढारी'ने हा प्रश्न लावून धरला होता.
राज्य शासनाने नुकतेच हृदयशस्त्रक्रिया विभागासाठी नव्या कायमस्वरूपी पदांवर तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. याखेरीज राज्य लोकसेवा आयोगामार्फतही काही तज्ज्ञांची निवड झाली असून केवळ मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी शासन आदेश निघणे बाकी आहे.
या विभागात हा अभ्यासक्रम सुरू झाला, तर पहिल्या काही वर्षांमध्ये गोरगरीब कुटुंबातील तीन बुद्धिवान तरुणांना 'डीएम कार्डिओलॉजी' हा महत्त्वाचा अभ्यासक्रम शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.