कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सूर्य अक्षरशः आग ओकत असून कोल्हापूर प्रचंड तापले आहे. अंगाची लाही लाही होत असून उन्हामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. दुपारी रस्ते ओस पडत असून वाहतूकही मंदावली आहे.
हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार बुधवारी एकाच दिवसात किमान तापमानात सरासरी तीन अंशांची वाढ होऊन पारा 39.5 अंशांवर गेला होता. 2021 नंतर एप्रिल महिन्यातील ही उच्चांकी वाढ होती. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य यंत्रणेने उपचारासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बेडस् राखीव ठेवले आहेत.
कोल्हापुरात बुधवारी किमान तापमानातही सरासरी 2 अंशांची वाढ होऊन पारा 24.2 अंशांवर स्थिरावला होता. अशात आर्दतेचे प्रमाण 64 टक्के असल्याने सायंकाळनंतरही अंगाची लाही लाही होत होती. 1 एप्रिल 2021 रोजी कोल्हापूरचे तापमान 39.5 अंश इतके नोंदवले गेले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात पहिल्यांदाच पारा 39 पार गेला आहे. कोल्हापुरात एप्रिल महिन्यातील सर्वोच्च तापमान 29 एप्रिल 1956 रोजी 41.7 अंश इतके नोंदवले गेले होते.
जिल्ह्यात उष्णतेचा कहर सुरू असून दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे अवघड बनले आहे. सकाळी दहानंतरच उन्हाची तीव—ता जाणवण्यास सुरुवात होते. उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारनंतर तर मुख्य रस्ते निर्मनुष्य होत आहे. नागरिक रस्त्यावरून फिरताना टोपी, छत्री, स्टोल, स्कार्फ, सनकोटचा वापर करत आहेत. आर्दतेचे प्रमाण आणि किमान तापमानात झालेली वाढ यामुळे सायंकाळनंतरही उकाडा कायम राहत असल्याने कोल्हापूरकर अक्षरशः हैराण झाले आहेत.
उन्हाची तीव—ता वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांनी उन्हात फिरताना खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे. गुरुवारी (दि. 20) विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यानंतर निरभ— अकाश राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.