कोल्हापूर

कोल्हापूरकरांकडून सहा मेट्रिक टन आंबा खरेदी

मोहन कारंडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरकरांनी पहिल्याच दिवशी सहा मेट्रिक टन आंब्याची खरेदी करत शाहू मिलमध्ये गुरुवारपासून सुरू झालेल्या 'आंबा जत्रे'ला उदंड प्रतिसाद दिला. अवघ्या आठ तासांत सुमारे सव्वासहा लाखांची विक्री झाली. अनपेक्षित विक्री झाल्याने या जत्रेत सहभागी झालेले उत्पादक शेतकरी अक्षरश: भारावून गेले.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल येथे गुरुवारपासून 'आंबा जत्रा' आयोजित केली आहे. तिचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले. विविध प्रजातींच्या आंब्यांची चव चाखायची असेल तर या 'आंबा जत्रे'ला जरूर भेट द्या, असे आवाहन रेखावार यांनी यावेळी केले. उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीअंतर्गत 'विकेल ते पिकेल' या संकल्पनेवर आधारित बांधावरून थेट ग्राहकांपर्यंत उत्पादन जावे, याकरिता ही थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. माफक दरात उपलब्ध केलेल्या या 'आंबा जत्रे'चा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले. यावेळी पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे तसेच कृतज्ञता पर्व समितीचे सदस्य उपस्थित होते. अपेक्षेपेक्षा जास्त उलाढाल झाल्यामुळे आंबा उत्पादकांनी जिल्हाधिकारी रेखावार यांचे यावेळी आभार मानले.

शुगर फ्रीसह विविध प्रजाती
अस्सल देवगड हापूससह रत्नागिरी हापूस, पायरी, बिटक्या, केंट, कोकण सम्राट, रत्ना, बारमासी, दशेहरी, फर्नांडीन, दूध पेढा, गोवा मानखुर, तोतापुरी, ऑस्टिन, लीली, नीलम आदी विविध प्रजातींचे आंबे या जत्रेत विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. वनराज व कीट हे शुगर फ्री प्रजातीचे आंबे जत्रेत आहेत, त्यांचीही ग्राहकांनी खरेदी केली.

सव्वासहा लाखांची उलाढाल
आंबा जत्रेत पहिल्या दिवशी तब्बल सहा मेट्रिक टन आंब्यांची विक्री झाली. यातून अंदाजे सव्वासहा लाखांहून अधिक रकमेची उलाढाल झाल्याची माहिती उपसरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले यांनी दिली.

पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद
रविवारपर्यंत चालणार्‍या या आंबा जत्रेला गुरुवारी पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. जत्रेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील 18 उत्पादक शेतकर्‍यांनी 18 स्टॉल लावण्यात आले आहेत. हे स्टॉल खुले होताच, त्यावर ग्राहकांची अक्षरश: झुंबड उडाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT