कोल्हापूर

कोल्हापूर : हातकणंगले-इचलकरंजी संपर्क तुटला; रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभार

दिनेश चोरगे

हातकणंगले; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रशासनाच्या गलथान आणि नियोजनशून्य कारभाराचा मन:स्ताप प्रवासी व नागरिकांना सहन करावा लागत आहे. चुकीच्या पद्धतीने भुयारी मार्ग खोदल्यामुळे भुयारी मार्गात आठ ते दहा फूट पाणी साचल्याने दोन्ही रस्ते बंद झाले. परिणामी इचलकरंजी आणि हातकणंगलेच्या परिसरातील गावांचा संपर्क वारंवार तुटत आहे. परतीच्या पावसाने बुधवारी सायंकाळी पर्यायी भुयारी मार्गही पाण्याखाली गेला. त्यामुळे शेकडो वाहनधारकांना भर पावसात रस्त्यावर ठाण मांडावे लागले. त्यामुळे उन्मत्त व गेंड्याच्या कातडीच्या रेल्वे प्रशासनाला जाग आणणार कोण? असा संतप्त सवाल प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.

हातकणंगले तालुक्यात दोन दिवसांपासून धुवाँधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या पाण्याचा प्रचंड वेग वाढल्यामुळे अस्ताव्यस्तपणे खोदून ठेवलेल्या भुयारी मार्गात आठ ते दहा फूट पाणी साचले. त्यामुळे इचलकरंजीशी हातकणंगलेचा संपर्क तुटला. पर्याय म्हणून तहसील कार्यालयापासून गेलेल्या रेल्वे भुयारी मार्गातही दुपारी चारनंतर पाणी आल्यामुळे तो मार्गही वाहतुकीसाठी बंद झाला. त्यामुळे प्रवाशांना तिष्ठत बसावे लागले. इचलकरंजीहून येणार्‍या आणि इचलकरंजीकडे जाणार्‍या पुणे, मुंबई, पेठवडगावसह परिसरातील प्रवाशांची मोठी कुचंबणा झाली. भरपावसात त्यांना रात्र काढण्याची वेळ आली. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका सेवाही थांबल्यामुळे रुग्णांचेही हाल होत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाविरुद्ध प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT