कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : काही गावांत भाजीपाल्याचा लगदा, काही भागात सोयाबीनच्या उरल्यात फक्त शिराट्या, पोटरीला आलेले भात पीक जमिनीला टेकले आहे. ही आहे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची परिस्थिती. गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सुमारे एक हजार हेक्टरवरील हाताला आलेली पिके वाया गेल्याची परिस्थिती आहे. विशेष म्हणजे करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड या तालुक्यांत पाऊस जास्त झाला. त्यामुळे नद्यांना महापूर आले. पण कमी पाऊस झालेल्या शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांत पंचगंगा, कृष्णा नद्यांना महापूर आले. त्यामुळे या भागातील भाजीपाला, फळे, सोयाबीन ही पिके पाण्याखाली गेल्याने त्या पिकांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे.
गेले चार दिवस जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील ताम—पर्णी, हिरण्यकेशी, चिकोत्रा, वेदगंगा, दूधगंगा, कुंभी, कासारी, पंचगंगा, कृृष्णा या नद्यांना महापूर आला आहे. यामुळे जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरण साठ्यातील पाण्याची पातळी वाढत आहे, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा लागला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सोयाबीन, भुईमूग ही पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे सोयाबीनची पाने आणि शेंगा झडल्याने शिराट्या उभ्या राहिल्या आहेत. पाण्याने सर्या तुंबल्यामुळे आडसाली ऊस लावण उगवणीत अडथळे निर्माण होत आहे. संततधार पावसामुळे काढणीसाठी आलेली सोयाबीन, भुईमूग ही पिके वाया जाण्याची भीती आहे.
दरम्यान, पावसाचा अंदाज घेऊन कृषी विभागाने माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. 65 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस ज्या भागात झाला असेल त्या भागातील पिकाची नोंद घेतली जाते. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबत कृषी विभागाच्या अधिकार्यांनी माहिती घेणे सुरू केले आहे. कृषी विभागाच्या नजरअंदाजानुसार जिल्ह्यातील सुमारे एक हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली असून पिकातील पाणी जास्त दिवस शेतात राहिल्यास पिके वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीला महापूर आल्यामुळे भाजीपाला, फळे ही पिके पाण्याखाली गेली आहेत. त्याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर होणार आहे.