कोल्हापूर

कोल्हापूर : हजार रुपयांत करता येणार शेतजमिनीची अदलाबदल

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सलोखा योजनेंतर्गत शेतजमीन अदलाबदलीचे दस्त एक हजार रुपयांत करता येणार आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या या योजनेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफीचा आदेश महसूल विभागाने काढला आहे.

मालकी हक्क, वहीवाट, शेत बांध, रस्ते, मोजणी, वाटणी, अतिक्रमण, चुकीच्या नोंदी आदी कारणांमुळे शेतीचे अनेक वाद गावागावांत आहेत. यापैकी अनेक वाद न्यायालयातही प्रलंबित आहेत. वेळ आणि खर्चाचा अपव्यय कमी व्हावा, अशा वादाने निर्माण झालेले वैरत्वाचे वातावरण कमी व्हावे, या हेतूने राज्य शासनाने सलोखा योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना एकमेकांत जमिनींची अदलाबदली करता येणार आहे. याकरिता मुद्रांक शुल्क केवळ 1 हजार रुपये इतके आकारले जाणार असून 100 रुपये नोंदणी फी आकारली जाणार आहे.

या योजनेचा शासन आदेश काढण्यात आला असून त्यानुसार ज्या शेतकर्‍यांकडे किमान बारा वर्षांपासून जमिनींचा ताबा आहे, अशाच जमिनींसाठी ही योजना लागू राहणार आहे. एकाच गावात अदलाबदली करणारी जमीन शेतकर्‍यांकडे असल्याचा मंडल अधिकारी व तलाठ्यांचा पंचनामा आवश्यक असून तसा पंचनामा केल्यानंतर देण्यात येणारे पंचनामा प्रमाणपत्र दस्ताला जोडावे लागणार आहे. ही योजना केवळ शेतीसाठी असून ती दोन वर्षांसाठी असेल, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.

SCROLL FOR NEXT