कोल्हापूर

कोल्हापूर : सीपीआरमधील सीसीटीव्ही बंद; चोर्‍या वाढल्या

Arun Patil

कोल्हापूर ; एकनाथ नाईक : कोरोना संसर्गात रुग्णांवरील उपचाराबाबत माहिती तत्काळ मिळावी म्हणून सीपीआरमध्ये जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने प्रत्येक वॉर्डात सीसीटीव्ही बसविले आहेत. तसेच सीपीआरच्या बाह्य परिसरावर पूर्वीपासून सीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे वॉच आहे. मात्र, वॉर्ड आणि परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. या संधीचा पुरेपूर फायदा चोरट्यांकडून घेतला आहे. त्यामुळे डॉक्टर, रुग्णांसह नातेवाईक अक्षरशः हैराण झाले आहेत.

गोरगरीब नागरिकांना सीपीआरचा मोठा आधार आहे. मोफत आणि माफक दरात उपचार यामुळे सीपीआरमध्ये दिवसेंदिवस उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील डॉक्टरांनी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, उपचार यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे रुग्णालयाची विश्वासार्हता वाढली आहे. कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह कर्नाटक राज्यातील रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होतात. पूर्वी वेळेत उपचार मिळत नाहीत, डॉक्टर व कर्मचारी उद्धट बोलतात, रुग्णांची हेळसांड केली जाते अशा तक्रारी सीपीआर प्रशासनाकडे येत होत्या. मात्र, याला सीपीआरने शिस्त लावली आहे; पण सध्या रुग्णालयात असणार्‍या सुमारे 30 ते 35 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांपैकी बहुसंख्या कॅमेरे बंद पडले आहेत.

सीपीआरमधील बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा गैरफायदा चोरट्यांनी उठविला आहे. मोबाईल, महागड्या सायकली, दुचाकी चोरी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. महाराष्ट्र सुरक्षा बल जवानांचा दिवस-रात्र खडा पहारा असतानाही चोरटे हात मारून जात आहेत. त्यामुळे सुरक्षा बलाच्या जवानांची झोप उडाली आहे. संशयितांवर पाळत ठेवून तीन चोर्‍या सुरक्षा रक्षकांनी उघडकीस आणला आहेत. सीपीआरमधील सर्व सीसीटीव्ही चालू केले तर चोरांवर वॉच ठेवणे अधिक सोयीचे होईल.

डॉक्टरांचे मोबाईल, दुचाकी, सायकली गायब

सीपीआरमध्ये दररोज शेकडो रुग्णांसह नातेवाईकांची ये-जा सुरू असते. प्राथमिक तपासणी व उपचार करून काहींना सोडले जाते, तर काहींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाते. बाह्यरुग्ण विभागात सकाळपासून मोठी रांग लागलेली असते. रुग्ण उपचारासाठी तर डॉक्टर तपासणीत असल्याचा फायदा घेऊन चोरटे मोबाईल, पाकिटावर डल्ला मारतात. इतकेच काय सीपीआर परिसरातील महागड्या सायकली, दुचाकी चोरीस गेल्या आहेत.

असे तोडले जाते लॉक

सीपीआरमधील डॉक्टरांकडे महागड्या सायकली, दुचाकी आहेत. कोणता डॉक्टर कोठे सायकल, दुचाकी लावतो. याची प्रथम टेहाळणी केली जाते. इतकेच काय डॉक्टर कोणत्या ओपीडीत कितीवेळ असतात, याची माहिती चोरटे करून घेतात. यानंतर बनावट चावी तयार करून हातोहात सायकली, महागड्या दुचाकी लंपास केल्या जात आहे. अशा प्रकारे चोरी करणार्‍या एका चोरट्याला महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी पकडून 'प्रसाद' दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT