कोल्हापूर

कोल्हापूर : सीपीआर होणार चकाचक!

Arun Patil

कोल्हापूर ; सुनील सकटे : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विविध इमारतींची डागडुजी, अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज व्यवस्था मजबुतीकरणासह विविध कामांसाठी 38 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभागातर्फे हा प्रस्ताव पाठवला आहे.

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय परिसरात 33 इमारती आहेत. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय हे जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या सेवेत असणारे एक महत्त्वाचे शासकीय रुग्णालय आहे. या रुग्णालयात दररोज हजारो रुग्णांवर उपचार केल जातात. सध्या रुग्णालय परिसरात असणार्‍या इमारती जुन्या आहेत. काही इमारती खूप जुन्या असल्याने इमारतीमधील प्लबिंग पाईप व शौचालय वारंवार नादुरुस्त होतात. दुरुस्तीनंतर काही दिवसांतच नवीन ठिकाणी गळती चालू होते. त्यामुळे या सर्व पाईप व शैचालयांची एकाच वेळी दुरुस्तीची गरज आहे.

प्रत्येक इमारतीचे बांधकाम वेगवेगळ्या कालावधीत झाल्याने इमारतीचा सांडपाण्याचा आराखडा वेगवेगळा आहे. त्यामुळे सांडपाणी निचरा होण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, हे सर्व सांडपाणी सीपीआरसमोरील रस्त्यावर वाहत जाऊन रस्ता वारंवार खराब होतो. त्यामुळे या सर्व इमारतींमधील सांडपाण्याचा एकत्रित आराखड्याची गरज आहे. या परिसरातील अंतर्गत रस्ते वेगवेगळ्या कालावधीत केल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, रस्ते वारंवार खराब होतात. बहुतांश इमारतीतील फरशा जुन्या आहेत. तसेच अनेक इमारतींमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती होते. गळतीमुळे भिंतीचा रंग खराब होतो. या सर्व समस्यांमुळे रुग्णांच्या आरोग्यास हानी पोहोचण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने सीपीआरमधील 22 इमारतींची डागडुजीचा 38 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. या सर्व इमारतींचा सर्व्हे करून सविस्तर आराखडा तयार केला आहे. या निधीतून सर्व इमारतींमधील शौचालय, बाथरूमची दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच सर्व इमारतींचे सांडपाणी आणि ड्रेनेजचे पाणी सोडण्यासाठी एकत्रित नियोजन केले आहे.

अस्वच्छतेतून स्वच्छतेकडे..?

सीपीआर म्हटले की लोकांसमोर एक अस्वच्छतेचे चित्र उभे राहते. वर्षानुवर्षे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने हे चित्र निर्माण झाले आहे. अस्वच्छता व खराब रस्ते, तुंबलेल्या गटारी, अस्ताव्यस्त पडलेले प्लास्टिक यामुळे सर्वत्र घाणीचे साम—ाज्य पसरले आहे. त्यामुळे सीपीआर हेच अनारोग्याचे ठिकाण बनल्याची स्थिती आहे. नव्या प्रस्तावामुळे हे चित्र आता बदलणार आहे.

SCROLL FOR NEXT