कोल्हापूर

कोल्हापूर : सीपीआर लिफ्ट दुर्घटनेतील त्या महिलेच्या मुलांना नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ

दिनेश चोरगे

कोल्हापूर; डॅनियल काळे :  सीपीआर हॉस्पिटलमधील हृदयशस्त्र विभागाच्या लिफ्टमध्ये अडकून वंदना राजेश गलांडे ( वय 26, रा. इचलकरंजी) या महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेच्या मृत्यूनंतर एक वर्षात तिच्या पतीचेही निधन झाले. तिच्या तीन मुलांच्या पालनपोषणासाठी व दुर्घटनेची नुकसानभरपाई म्हणून चार लाख रुपये देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. परंतु, या निर्णयानंतरही केवळ दीड लाख रुपयांवर सीपीआर प्रशासनाने बोळवण केली असून, उर्वरित अडीच लाख रुपयांसाठी मात्र हेलपाटे मारण्याची वेळ मृत महिलेच्या वडिलांच्यावर आली आहे. नातवंडांच्या पालनपोषणाचीही जबाबदारी त्यांच्यावरच आहे. परंतु, सीपीआर प्रशासनाने अद्यापही अडीच लाख रुपये दिले नसल्याने त्यांनी आता संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाला मुलांचाही कळवळा का वाटत नाही, असा संताप त्यांनी दै.'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला आहे.

सीपीआर हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर वंदना राजेश गलांडे या महिलेला हृदयाचाही त्रास जाणवू लागल्याने त्यासंदर्भातील तपासण्या आणि उपचार करण्यासाठी 5 डिसेंबर 2011 या दिवशी या महिलेला लिफ्टमधून वरच्या मजल्यावर शिफ्ट करत असतानाच लिफ्टमध्ये अडकून या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला तीन मुले आहेत. यापैकी ऐश्वर्या (वय 16), सुनील (वय 14) आणि समर्थ (वय 10) अशी मुलांची नावे आहेत. दुर्घटना घडली तेव्हा ही तीनही मुले 4 वर्षांच्या आतील होती. समर्थचा तर नुकताच जन्म झाला होता. या घटनेनंतर अवघ्या एक वर्षात महिलेचा पती राजेश गलांडे यांचेही निधन झाले. मुलीचे वडील लक्ष्मण सोलापुरे हे वॉचमन म्हणून काम करतात. अवघ्या चार हजार रुपयांच्या वेतनावर ते कसाबसा संसार करत आहेत. मुलीच्या मृत्यूनंतर तिन्ही नातवंडाच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आली.

लक्ष्मण सोलापुरे यांनी दुर्घटनेनंतर सीपीआर प्रशासन, राज्य शासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागावर दावा ठोकला होता. लिफ्टची देखभाल व्यवस्थित झाली नसल्याने हा अपघात झाला. त्यामुळे यासाठी संबंधित महिलेच्या मुलांच्या पालनपोषणासाठी 4 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. परंंतु, न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी अद्याप
झालेली नाही. मृत महिलेचे वडील लक्ष्मण सोलापुरे वयोवृद्ध झाले असून, हेलपाटे मारुन ते थकले आहेत. मुले देखील अजून लहानच आहेत.

पालनपोषण करायचे तरी कसे?

दुर्घटनेत मुलगी गेल्याचे दु:ख सोबत घेऊन नातवंडांचे पालनपोषण करत आहोत. त्यांच्या शिक्षणासाठी पैसे मिळतील, असे वाटत होते; पण आता हेलपाटे मारावे लागत आहेत. कोणीच दखल घ्यायला तयार नाही. मीसुद्धा आता थकलो असून, मुलांचे पालनपोषण कसे करायचे. त्यांना शिक्षण कसे द्यायचे हा प्रश्न आमच्यासमोर आहे. गोरगरिबांना कोण वाली नाही, याचा अनुभव मी घेत आहे. (लक्ष्मण सोलापुरे-मालसुरे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT