कोल्हापूर ; प्रवीण मस्के : बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकर्यांच्या हक्कांसाठी झगडणारे, महाराष्ट्र व मराठीच्या अस्मितेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करणार्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील दुर्मीळ फोटो, विविध कामगार आंदोलनांतील छायाचित्रे, कादंबर्यांवरील मराठी चित्रपटातील अभिनयसंपन्न भूमिकांचा चित्रमय चरित्रग्रंथ लवकरच प्रकाशित होणार आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधन समितीने पुढाकार घेतल्याने अण्णा भाऊंच्या जीवनकार्यास नव्याने उजाळा मिळणार आहे.
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत व परिवर्तनात महत्त्वाचे योगदान राहिले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम अण्णा भाऊ साठे यांनी केले. विद्यार्थी व अभ्यासक अण्णा भाऊंच्या साहित्याचा आजही संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. यात प्रामुख्याने अण्णा भाऊ साठे यांचा चित्रमय चरित्र ग्रंथ प्रकाशित करणे, त्याचबरोबर अण्णा भाऊ साठे यांच्या कथा आणि कादंबर्यांचे खंड पुनर्मुद्रित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
यापूर्वी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्रमय चरित्र ग्रंथ राज्य शासनाने प्रकाशित केले आहेत. त्यानुसार साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीच्या निमित्ताने अण्णा भाऊ साठे यांच्या संपूर्ण जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचा चित्रमय चरित्र ग्रंथ अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे लवकर प्रकाशित केला जाणार आहे. याचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे.
अण्णा भाऊ साठे यांचे बालपण, वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास, मुंबईतील कोहिनूर मिलमधील गिरणी कामगार, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी मराठवाडा, विदर्भ, खानदेशात घेतलेले लाल बावटा कलापथकाचे लोकनाट्य, शाहिरी कार्यक्रम, रशियातील मॉस्को आकाशवाणीवरून गायलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहासाचा पोवाडा, रशियाच्या पंतप्रधानांसोबत झालेली चर्चा, अनेक कादंबर्यांवर मुंबईत तयार केलेली 'वारणेचा वाघ', 'फकिरा', 'डोंगरची मैना', 'टिळा लावते मी रक्ताचा' या मराठी चित्रपटांची पोस्टर्स, 'फकिरा' चित्रपटात सावळा नानाची अभिनेते म्हणून केलेली भूमिका यासंबंधीची छायाचित्रे, कथा आणि कादंबर्यांच्या मुखपृष्ठ यांचा चित्रमय चरित्रग्रंथात समावेश असणार आहे.
* साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या 32 कादंबर्या व 14 कथासंग्रहांतील शेकडो कथा, ऑडिओ व ई-बुक स्वरूपात महाराष्ट्र शासनातर्फे चरित्र साधन समितीच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येणार आहेत. हे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या कथा-कादंबर्यांची हस्तलिखित व त्यांनी लिहिलेली पत्रे महाराष्ट्रातील वाचक, कार्यकर्त्यांच्या संग्रही आहेत. त्यांचेही संकलन करून प्रकाशन केेले जाणार आहेत.