कोल्हापूर

कोल्हापूर : सायबर गुन्हेगारी वाढली; पोलिस ठाण्यात मात्र ‘प्रभारी’

Arun Patil

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : तुमचे लाईट बिल भरलेले नाही, कनेक्शन बंद होणार आहे… पाच देशांतून तुमचा मोबाईल नंबर लकी ड्रॉमधून निवडला आहे… तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागली आहे… तुमचे एटीएम बंद पडणार आहे… अशा विविध कॉलनी सर्वसामान्य सध्या वैतागले आहेत. सायबर गुन्हेगार घरात बसलेल्यांच्या खिशावर दरोडे घालत आहेत. अशावेळी सायबर गुन्ह्यांचा तपास मुळापर्यंत जात नसल्याची भावना फसगत झालेल्यांमधून व्यक्त होत आहे. सध्या सायबर पोलिस ठाण्याचा पदभारही प्रभारी अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला आहे.

गुन्हेगारीचे विश्व सध्या सायबर गुन्ह्यांनी गाजते आहे. घरफोडी, जबरी चोरी यापेक्षाही सायबर गुन्हेगारांकडून घातले जाणारे दरोडे गंभीर आहेत. लॉटरी, जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री, नोकरीचे आमिष, ट्रेडिंग, एटीएम बंद पडल्याची भीती घालून हॅकर्स सामान्यांच्या खिशातून पैसे काढून घेत आहेत. दिवसागणीक या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे.

प्रभारींवर मदार

सायबर पोलिस ठाण्याचा पदभार सध्या प्रभारी पोलिस निरीक्षकांकडे आहे. फसवणुकीचे कॉल दिवसभर सायबर पोलिस ठाण्यात खणाणत असतात. अपुर्‍या मनुष्यबळामुळे अनेकजण तपास कामात असल्याने दररोजच्या या फसवणुकीकडे पुरेसे लक्ष घालण्यासाठी पूर्णवेळ अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र, सायबर पोलिस ठाण्यासारख्या महत्त्वाच्या विभागाचा पदभार सध्या प्रभारींकडे आहे.

पोलिस ठाण्यांकडे अर्ज प्रलंबित

फसवणुकीबाबत कार्यवाही करताना बँकेतून व्यवहार थांबवावे लागतात. बँकेशी संपर्क साधला असता एफआयआर आणा, अशी मागणी बँकेकडून होते. परंतु, नेमका प्रकार घडला तो तक्रार अर्जात लिहून द्या, असा सल्ला पोलिस ठाण्यात दिला जातो. यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांकडे 400 हून अधिक तक्रार अर्ज प्रलंबित आहेत. पूर्णवेळ अधिकारीच नसल्याने तपास थंडच आहे.

पोलिस ठाण्यांवर मर्यादा

पोलिस ठाण्यांकडे सायबर गुन्हा नोंदविताना तपासाच्या मर्यादा येतात. गुन्हा घडल्यानंतर काही तासांत जर त्यावर योग्य कार्यवाही करून ते व्यवहार थांबविले, तर पैसे परत मिळण्याची शक्यता असते; पण फसगत झालेली व्यक्ती पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर त्याला पुन्हा सायबर पोलिस ठाण्याकडे पाठविले जाते. पोलिस ठाण्यात तपास करण्यावर मर्यादा असल्याने नेमके काय करावे, हे तक्रारदारालाही समजत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT