कोल्हापूर

कोल्हापूर : सादळे-मादळे घाटात मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा

Arun Patil

कासारवाडी ; पुढारी वृत्तसेवा : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सादळे-मादळे (ता. करवीर) येथील घाटात पर्यटनासाठी येणारे काही तरुण मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत आहेत. अशा पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक व इतर पर्यटकांमधून होत आहे.

पाऊस सुरू झाल्याने मागील काही दिवसांपासून सादळे-मादळे येथे हिरवागार सजलेला निसर्ग व वर्षा पर्यटनासाठी अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासोबत येऊन निसर्गाचा आनंद घेतात. पण अलीकडे काही अतिउत्साही तरुण मद्यधुंद अवस्थेत येऊन रस्त्याकडेलाच आपली गाडी लावून धिंगाणा घालतात. यामुळे इतर पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय सोबत आणलेले प्लास्टिक वस्तू, बाटल्या तेथेच उघड्यावर टाकतात.

शनिवारी अशाच काही तरुणांची चारचाकी गिरोली पेट्रोल पंपाजवळ नाल्यात उलटली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना सादळे-मादळे घाटात झाली असती तर प्रवाशांसह गाडी शोधावी लागली असती, अशी चर्चा स्थानिक नागरिक करत होते. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

SCROLL FOR NEXT