कासारवाडी, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याने बहरलेला सादळे-मादळे घाट जितका सुंदर दिसतो, तितकाच अपघातासाठी धोकादायक म्हणून ओळखला जातो.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून टोपपासून कासारवाडी, सादळे-मादळे, जोतिबा, पन्हाळ्याकडे जाणारा घाट रस्ता वाघ बीळजवळ रत्नागिरी मार्गाला जोडला जातो. पर्यटक, भाविक या राज्यमार्गाचा वापर करतात. यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. कासारवाडी ते सादळे चार किलोमीटर घाट आहे. तीव्र चढउतार, यू आकाराची धोकादायक वळणे, अरुंद रस्ते, दिशादर्शक फलकांचा अभाव, रस्त्याकडेला वाढलेली झाडेझुडपे यामुळे या मार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. बांधकाम विभागाचे याकडे अजून लक्ष गेले नसेल का, असा प्रश्न पडतो.
अपघातांची मालिकाच
दोन वर्षांपूर्वी शाळेच्या सहलीची बस या घाटात कठड्याला तटून झुलत होती. यावेळी सुदैवाने मोठा अपघात टळला होता. 14 मार्च 2022 रोजी ऊसतोड मजुरांची ट्रॅक्टर ट्रॉली या घाटातील वळणावर पडून मोठा अपघात झाला होता. यात दोन ठार व 22 जखमी झाले होते.