कोल्हापूर; आशिष शिंदे : ऐन पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने कोल्हापूरकर उन्हाच्या झळांमध्ये होरपळून निघत आहेत. गेल्या सात वर्षांनंतर ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदाच कोल्हापूरचे तापमान 31 पार गेले आहे. बुधवारी हा पारा तब्बल 31.3 अंशांवर पोहोचला असून, कमाल तापमानात सरासरी 4, तर किमान तापमानात 3 अंशांनी वाढ झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.
श्रावण महिन्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू असतो. मात्र, यंदा पावसाने पाठ फिरवल्याने केवळ उन्हाच्या झळा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाल्या. बुधवारी कमाल तापमानाने गेल्या सात वर्षांतील रेकॉर्ड मोडले. 19 ऑगस्ट 2015 रोजी कोल्हापूरचा पारा 31.3 अंशांवर गेला होता. त्यापूर्वी 22 ऑगस्ट 2014 रोजी तापमान 31.6 अंश, तर 25 ऑगस्ट 1950 रोजी सर्वाधिक 32.2 अंश इतके तापमान नोंदवले गेले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाची तीव—ता वाढल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. दिवसभर आकाश निरभ— राहत असल्याने उकाड्याची तीव—ता अधिक जाणवत आहे. सायंकाळी मात्र वादळी वार्यांसह पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा जाणवत होता. गेल्या 24 तासांमध्ये कोल्हापूरमध्ये 1 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे.
दरम्यान, पुढील दोन-तीन दिवस वातावरण अंशतः ढगाळ व मध्यम पाऊस किंवा गडगडाटी वादळाची शक्यता असून, कमाल तापमान 30 ते 31 तर किमान तापमान 23 ते 24 अंशांपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.
बुधवारी कोल्हापूरचे कमाल तापमान तब्बल 31.3 अंश नोंदवले गेले. तापमानात सरासरीपेक्षा 4 अंशांनी वाढ पाहायला मिळाली. तसेच किमान तापमानातदेखील सरासरी 3 अंशांची वाढ होऊन पारा 23.5 अंशांवर गेला होता.