कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
गजबजलेल्या मध्यवर्ती टाकाळा चौकातील 'मौनी विहार' इमारतीमधील सराफी दुकान फोडून सराईत चोरट्यांनी 21 लाख रुपये किमतीचे 39 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. सोमवारी पहाटे ही घटना घडली. सराईतांनी रेकी करून चोरी केली असावी, असा शाहूपुरी पोलिसांचा संशय आहे.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. भरचौकात घडलेल्या घटनेमुळे व्यापारीवर्गात चिंतेचे सावट आहे. सराफी व्यावसायिक रणजित पारेख यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. टाकाळा चौक परिसरात 'मौनी विहार' इमारतीत पारेख यांचे रणजित इंटरप्रायझेस हे सराफी दुकान आहे. दोन मजली दुकानातील पहिल्या मजल्यावर ट्रॅव्हल्सचे कार्यालय, तर त्यावरील मजल्यावर सराफी पेढी आहे. रविवारी (दि. 8) पारेख यांच्यासह कर्मचार्यांनी दुकान बंद केले. आज, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मालक, कर्मचारी दुकान उघडण्यासाठी आले असता शटर्सची कुलपे तोडल्याचे निदर्शनास आले. दुसर्या मजल्यावर जाऊन पाहणी केली असता, दरवाजाची काच फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. सराफी पेढीतील चार शोकेस फोडून चोरट्यांनी 39 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले.
शोकेसमध्ये चांदीच्या दागिने तसेच होते. पारेख यांनी शाहूपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. वरिष्ठ अधिकार्यांसह गुन्हे अन्वेषणचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात येत आहे, असे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले.