कोल्हापूर

कोल्हापूर : सरपंचपदाचे 2682 अर्ज वैध; उद्या दुपारपर्यंत माघारीची मुदत

दिनेश चोरगे

कोल्हापूर;  पुढारी वृत्तसेवा :  ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीसाठी सोमवारी जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर प्रचंड गर्दी झाली होती. सरपंचपदासाठी 2682 उमेदवार अर्ज तर सदस्य पदाचे 16 हजार 523 अर्ज पात्र ठरविण्यात आले. सायंकाळी छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली. उमेदवारी अर्ज माघारीला मंगळवार (दि. 6) पासून सुरुवात होणार आहे. बुधवारी (दि. 7) दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे. याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत सरपंचपदासाठी 2 हजार 701 छाननीसाठी सकाळपासून केंद्रांवर गर्दी होती. सरपंचपदासाठी 24, सदस्य पदासाठी 167 अर्ज अपात्र ठरले.
अनेक उमेदवार वकिलांसह छाननीसाठी उपस्थित होते. छाननी दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

उमेदवारांच्या माघारीसाठी ते नोकरी करत असलेल्या ठिकाणच्या वरिष्ठांपासून ते नात्यातील व्यक्तींना तसेच जवळच्या मित्रांशी संपर्क साधून माघारीची तयारी सुरू आहे. ज्याची अडचण वाटते त्याच्या माघारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. एवढेच नव्हे तर दूध संस्था, सोसायटी येथे संचालकपद देण्याची तयारी दाखविली जात आहे. त्यामुळे माघारीसाठी दोन दिवसांत नेत्यांमध्येच प्रचंड चढाओढ आहे. ज्यांच्या संस्थेत उमेदवार नोकरीस आहे तेथे माघारीशिवाय कोणताही पर्याय त्यांच्याकडे नाही. काही ठिकाणी उमेदवाराला झालेल्या खर्चाची भरपाई देण्याची तयारीही दाखविली जात आहे.

SCROLL FOR NEXT