कोल्हापूर

कोल्हापूर : सम्राट कोराणेसह साथीदारांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

दिनेश चोरगे

कोल्हापूर : मटकाबुकी सम्राट कोराणेसह साथीदारांनी 'मोका'अंतर्गत कारवाईविरोधात दिलेली आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या सर्वांच्या अटकपूर्व जामिनाचाही अर्ज फेटाळल्याने या सर्वांवर अटकेची कारवाई अटळ आहे. विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी कोल्हापूर पोलिसांची बाजू भक्‍कमपणे मांडली. यापूर्वीही एप्रिल 2020 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानेही संशयितांची 'मोका' कारवाईला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे.

मुंबईतील संशयित मटकामालक विरेल प्रकाश सावला, प्रकाश ऊर्फ पप्पू सावला, जयेश हिरजी सावला, शैलेश गुणवंत मणियार, जितेंद्र ऊर्फ जितू कांतिलाल गोसलिया, जयेश सेवांतीलाल शहा (सर्व रा. मुंबई), सम—ाट सुभाष कोराणे, शरद देवास कोराणे, मेघराज कुंभार, सुरेश जयवंत सावंत (सर्व रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर), राकेश मदनलाल अग्रवाल, मनीष किशोर अग्रवाल (रा. इचलकरंजी), झाकीर अब्दुल मिरजकर (रा. सांगली), अंकुश मारुती वग्रे (रा. कोरोची, ता. हातकणंगले), सलीम यासीन मुल्‍ला, शमा सलीम मुल्‍ला, राजू यासीन मुल्‍ला, जावेद यासीन मुल्‍ला (रा. यादवनगर) अशांसह 44 जणांविरोधात 'मोका'चा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

42 जणांना अटक

8 एप्रिल 2019 रोजी प्रशिक्षणार्थी सहायक अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांच्या पथकाने सलीम मुल्‍ला याच्या यादवनगरातील मटकाअड्ड्यावर छापा टाकला होता. यावेळी सलीम मुल्‍ला आणि साथीदारांनी या पथकावर प्राणघातक हल्‍ला केला होता. या कारवाईची दखल घेऊन तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन शहर उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी या प्रकरणाचा तपास केला. यातून 44 जणांविरोधात विशेष 'मोका' न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यापैकी 42 जणांना अटक झाली आहे. यापैकी सम—ाट कोराणे व पप्पू सावला हे दोघे कारवाईपासून पसार आहेत.

उच्च न्यायालयात आव्हान

कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या 'मोका' कारवाईला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावेळीही कोल्हापूर पोलिसांनी कारवाईचे गांभीर्य, संशयितांनी काळ्याधंद्यांतून मिळवलेली संपत्ती, त्यांची दहशत याबाबत न्यायालयात बाजू मांडली. यामुळे 21 एप्रिल 2020 रोजी मुंबई उच्च न्यायालयानेही सम—ाट कोराणेसह 14 जणांची 'मोका' कारवाईला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली होती.

सहा महिन्यांपासून पाठपुरावा

कोराणे, सावला पिता-पुत्र आणि अग्रवाल बंधूंसह 44 जणांविरोधातील 'मोका' कारवाईला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. कोल्हापूर पोलिसांनी मागील सहा महिन्यांपासून याबाबत भक्‍कमपणे बाजू मांडली. महत्त्वाची कागदपत्रे, संशयितांनी मटका व्यवसायातून मिळवलेली संपत्ती आदींचे विवरण न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते. पोलिसांच्या या प्रयत्नाला यश आले असून, सर्वोच्च न्यायालयानेही संशयितांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे पोलिसांचे मनोबल वाढल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

मालमत्तेवरही टाच

संशयितांनी अवैध व्यवसायातून मिळवलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तेबाबतही पोलिसांनी न्यायालयाला माहिती दिली होती. मुख्य संशयित सम—ाट कोराणे, पप्पू सावला पसार झाल्याने त्यांच्या मालमत्तेवर जप्‍ती आणण्याबाबतही पोलिसांनी हालचाली सुरू केल्या होत्या. या कारवाईमुळे संशयितांच्या मालमत्तेवरही टाच येणार असल्याचे बोलले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT