कोल्हापूर

कोल्हापूर : सकल मराठा शिष्टमंडळ-जिल्हाधिकार्‍यांमध्ये खडाजंगी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाबाबत एका शासकीय अधिकार्‍याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात 15 ऑगस्टला झालेल्या एका गोपनीय बैठकीत असे घडल्याचा संदर्भ सकल मराठा समाज आंदोलकांनी जिल्हाधिकार्‍यांना देत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाब विचारला. यावर असा कोणताही प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात घडला नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. या चर्चेवेळी अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांच्यासह आंदोलक आणि जिल्हाधिकार्‍यांमध्ये खडाजंगी झाली.

मराठ्यांच्या भावना दुखाविणार्‍या सोशल मीडियावरील 'मराठा वनवास यात्रा'चे कार्यकर्ते योगेश केदार यांच्या एका पोस्टबाबत विचारणा करण्यासाठी सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी हा सर्व प्रकार घडला. अधिकार्‍यांच्या बैठकीत असे चुकीचे वक्तव्य करण्यात आले असेल तर संबंधितावर कारवाई करावी; अन्यथा त्याचा शोध घेऊन आम्ही आमच्या पद्धतीने समाचार घेऊ, असा पवित्रा यावेळी सकल मराठा समाज शिष्टमंडळाने घेतला होता.

मराठा आरक्षणाबाबत 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतील केदार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये 'मराठा समाजाला आरक्षण दिल्यास सीमाभागात दंगली होतील' असे एका शासकीय अधिकार्‍याने बोलल्याचा उल्लेख आहे. यावर काय कारवाई करण्यात आली, असा सवाल अ‍ॅड. बाबा इंदुलकर, संजय पवार, विजय देवणे यांनी उपस्थित केला.

आंदोलक आक्रमक

तुम्ही आमची भूमिका जाणून घ्या. मराठा समाजाचे कोण दुश्मन आहेत हे समजले पाहिजे. चुकीचे वक्तव्य झाले नसेल तर तसे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करावे, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. तर असे काहीही घडले नसून कपोलकल्पीत बाबीवर मी बोलणार नाही, माझ्याकडे इतर कामे आहेत. असे जिल्हाधिकार्‍यांनी बोलताच आंदोलक आक्रमक झाले. यावेळी शाब्दिक चकमक उडाली. शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांनी आंदोलकांना शांत करत असे काही घडले नसेल तर जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्टीकरण द्यावे, आंदोलक त्यानंतर पुढील निर्णय घेतील, असे सांगत ही चर्चा संपवली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आर. के. पोवार, दिलीप देसाई, बाबा पार्टे, माजी नगरसेविका रूपाराणी निकम, संगीता खाडे, कमलाकर जगदाळे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

SCROLL FOR NEXT