कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पत्रकारितेच्या क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना संजय घोडावत विद्यापीठ आयकॉन (एस.जी.यू. आयकॉन) पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. जाधव यांच्यासह कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, डॉ. मंगेश कराड, डॉ. संतोष प्रभू, क्रिकेटपटू स्मृती मानधना यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. 28) सकाळी साडेदहा वाजता संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
संजय घोडावत विद्यापीठाच्या वतीने कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, उद्योग तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांना दरवर्षी दि. 28 फेब—ुवारी रोजी संजय घोडावत विद्यापीठ आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी डॉ. प्रतापसिंह जाधव यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. निर्भीड आणि नि:पक्ष पत्रकारितेचे व—त जोपासत, सर्वसामान्यांचा आधारवड ठरत पत्रकारिता क्षेत्रात प्रत्येकाला प्रेरणादायी, दिशादर्शक ठरावे असे कार्य डॉ. जाधव यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याच्या सन्मानार्थ हा पुरस्कार दिला जात असल्याचे संजय घोडावत व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले.
यापूर्वी डॉ. पी. डी. पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. संजय चोरडिया, निवृत्त सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, नेमबाजपटू तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, क्रिकेटपटू अनुजा पाटील, सोनाली नवांगुळ आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.