कोल्हापूर

कोल्हापूर : शेवटच्या क्षणापर्यंत प्रचाराचा धुरळा

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या बनलेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघ (Kolhapur North By-Election) पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता रविवारी झाली. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या जाहीर प्रचार संपला असला, तरी मतदानाच्या दिवसापर्यंत सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

महाविकास आघाडी व भाजपकडून प्रचाराच्या निमित्ताने पदयात्रा, प्रचार फेर्‍या, कोपरा सभांचे आयोजन केले जात होते. चाय पे चर्चाबरोबरच मिसळ पे चर्चा, कटवडा पे चर्चा झडल्या. रविवारी दिवसभरात जो प्रचार केला त्याचे व्हिडीओ कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते. रविवारी सकाळपासूनच प्रमुख नेते मंडळींकडून प्रचाराची सांगता आहे, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून आपला उमेदवार व चिन्ह पोहोचवा, असा संदेश देण्यात आला होता. त्याप्रमाणे कार्यकर्ते कामाला लागले होते. घरटी मतदारांपर्यंत पोहोचणे, मतदानाच्या स्लिप देणे, मतदान केंद्र व खोली क्रमांक सांगण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. राजकीय पक्षांकडून शक्‍तिप्रदर्शन करण्यात आले. तर अपक्ष उमेदवारांनी आपापल्या परीने मतदारांपर्यंत आपला जाहीरनामा पोहोचवला.

स्थानिक मतदारांबरोबरच परगावी गेलेल्या मतदारांची यादी तयार करणे, त्यांना मतदानासाठी आणणे, यासाठी कायकर्ते कामाला लागले आहेत. मतदारयादीवर अंतिम नजर फिरवून मतदान कसे कॅच करता येईल यासाठी जोडण्या घातल्या जात आहेत. प्रत्येक मतदाराचा फोन, ई-मेलवर मेसेज टाकून त्यांना आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. विरोधी उमेदवारांचा प्रचार कसा फ्लॉप झाला, आपला कसा यशस्वी झाला, हे सांगण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मेसेजने सोशल मीडियावर प्रचार सुरूच आहे.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रचाराच्या रिक्षा गल्‍ली-बोळांतून फिरताना दिसत होत्या. जाहीर प्रचाराची सांगता झाल्याने सोशल मीडिया हाच मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आधार असल्याने सर्वांच्या नजरा आता फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर खिळून आहेत.

सोशल मीडियासाठी आय.टी. क्षेत्रातील तज्ज्ञांचा ताफा (Kolhapur North By-Election)

राजकीय पक्षांनी सोशल मीडियावरून प्रचार चालवण्यासाठी खास आय.टी. क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांना पाचारण केले आहे. मतदानाच्या दिवशी कोणत्या भागात किती मतदान झाले, याची माहिती बूथवरील उमेदवारांकडून घेतली जाणार आहे. यानंतर ज्यांनी मतदान केले नाही त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांची स्वतंत्र फौज तयार करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांचे सोशल मीडियावर काम करणारे बॅक ऑफिस मजबूत असल्याने मतदारांपर्यंत आपल्या उमेदवाराला पोहोचवण्याची जबाबदारी आय.टी. सेलवर आहे.

SCROLL FOR NEXT