कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संसर्ग कमी झाल्यावर दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच 15 जून रोजी शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी पालक, विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी होती. पुस्तकांपासून गणवेशापर्यंत सर्वच शैक्षणिक साहित्य महागले असले तरी विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
कोरोनामुळे काही विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. यंदा कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा नियमित वेळेत सुरू होत आहेत. मल्टिकलर स्कूल बॅग, मॅजिक कंपास बॉक्स, कलरफुल पेन्सिल, कार्टूस असलेली पाण्याची बॉटल, विविधरंगी गणवेश अशा विविध प्रकारच्या शालेय साहित्यांनी बाजारपेठेतील दालने सजली आहेत. रविवारी पालक, विद्यार्थ्यांनी पेन, पेन्सिल, वह्या, पुस्तके व गणवेश खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. जुन्या बाजारात वह्या, पुस्तके तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेनकोट, छत्रीची खरेदी पालकांनी केली.