कोल्हापूर

कोल्हापूर : शहरातील रस्ते गर्दीने फुलले

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  घरगुती गणपती विसर्जनानंतर शहरातील काही देखावे खुले झाले. मंगळवारी बहुतांशी सर्वच देखावे खुले झाल्याने रस्त्यांवर गर्दी उसळली होती. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, राजारामपुरी, शाहूपुरीतील रस्त्यांवर अक्षरश: रांगा लागल्या होत्या. अनेकांनी सहकुटुंब देखावे पाहण्याचा आनंद लुटला. कसबा बावडा परिसरातही मध्यरात्रीपर्यंत देखावे पाहण्यास गर्दी उसळली होती. शहराच्या वर्दळीच्या मार्गावरील वाहतूकही अन्य मार्गाने वळविण्यात आली.

शिवाजी पेठेतील मंडळांनी ऐतिहासिक तसेच विनोदी सजीव देखाव्यांवर भर दिला आहे. रंकाळा टॉवर येथील कै. उमेश कांदेकर मंचचा छत्रपती शिवाजी महाराजांवरील देखावा, मित्र प्रेम मंडळ, गोल्ड स्टार स्पोर्टस् यांचे ऐतिहासिक देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तसेच बुवा चौकातील जय शिवराय मित्र मंडळ, शिवशक्‍ती स्पोर्टस् मंडळाचे विनोदी देखावे मंगळवारी खुले झाले.
राजारामपुरीतील मंडळांनी विद्युत रोषणाईने नटलेली मंदिरे, बाहुबली सेट उभे केले आहेत. शिवाजी तरुण मंडळ, शिवाजी तरुण मंडळ, दुसरी गल्‍लीचा बाहुबली चित्रपट सेट, राजारामपुरी स्पोर्टस्चा राजमहाल, जय मराठा मंडळाचा तांत्रिक देखावा हे चिमुकल्यांच्या आकर्षणाचे केंद्र बनले. तसेच अमरनाथ गुंफा, इस्रो यानाची झलक येथे पाहायला मिळत आहे. शाहूपुरीच्या शिवनेरी मित्र मंडळाचे मोफत फन फेअर, राजर्षी शाहू महाराजांची अंबारीतून मिरवणूक, राधाकृष्ण मंडळाचे कलात्मक मंदिर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

जुना बुधवार पेठ, शनिवार पेठेत आकर्षक गणेशमूर्तीना पसंती

तोरस्कर चौकातील नुक्‍कड मित्र मंडळाचा पैलवान गणेशासह एस. पी. बॉईज, द्विमुखी मारुती मंडळ, गवळी ग्रुप, साई मित्र मंडळ, सम—ाट चौकातील 21 फुटी गणेशमूर्ती, जुना बुधवार पेठेची 21 फुटी गणेशमूर्ती, न्यू अमर मित्र मंडळाच्या गणेशमूर्तींना मोठी पसंती मिळत आहे. तसेच तोरस्कर चौकातील सोल्जर्स ग्रुप व डांगे गल्‍ली तरुण मंडळांनी राजर्षी शाहू महाराजांचा परिचय देखाव्यातून करून दिला आहे.

सामाजिक विषयांवर भाष्य

राजारामपुरीतील युवक मित्र मंडळाने शहरांतील समस्यांवर भाष्य करणारे फलक उभारून शहरवासीयांचे लक्ष वेधले. तसेच व्हीनस कॉर्नर परिसरातील त्रिमूर्ती मंडळाने कचर्‍याची स्थिती, भविष्यातील धोके, जनावरांच्या पोटात जाणारे प्लास्टिक अशा विषयांना हात घातला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT